बुबनाळ : औरवाड-नृसिंहवाडी दरम्यान कृष्णा नदीवर असलेला जुना पूल हा बेकायदेशीर वाळूमाफियांचा अड्डा बनला आहे. पुलावरच नदीतून चोरलेल्या वाळूचे डेपो मारले जात असताना शिरोळ तहसील कार्यालयातील महसूल विभाग गप्प का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाळूउपसा करण्यासाठी पर्यावरण विभागाने बंदी घातली आहे. असे असताना औरवाड परिसरात बेकायदेशीर वाळू चोरी आणि वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नृसिंहवाडी दत्त मंदिरासमोर, गौरवाड पाणवठा, कुंरूदवाड घाटासमोर रात्री तरुण ग्रुप करून मोटारसायकलवरून वाळूची चोरी करीत असतात. नृसिंहवाडी-औरवाड दरम्यान असलेल्या जुन्या पुलावर वाळूचे डेपो मारून वाहतूक केली जाते. याकडे नृसिंहवाडी मंडल अधिकारी, तलाठी, शिरोळ तहसील कार्यालयातील महसूल विभागाने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
चौकट - अर्थपूर्ण घडामोडी
औरवाड-नृसिंहवाडी दरम्यान असलेल्या दोन्ही पुलावरून वाळू आणि मातीची बेकायदेशीर वाहतूक सुरू आहे. नव्या पुलावरून माती आणि जुन्या पुलावरून वाळूची वाहतूक होत आहे. याकडे पोलीस, महसूल विभाग अर्थपूर्ण घडामोडीमुळे दुर्लक्ष नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. औरवाडमधील एक वाळू व्यावसायिक बाहेर जिल्ह्यातून वाळू आणून त्यात काळी राख, ओढ्यावरची वाळू मिसळून धुवून ती वाळू विकत असल्याची चर्चा आहे.
फोटो - १००६२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळ - नृसिंहवाडी-औरवाड जुन्या पुलावर अशा प्रकारे नदीतील वाळूउपसा करून ढीग रचले जात आहेत. (छाया - रमेश सुतार)