कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयाने उपवडेपैकी न्हाव्याचीवाडी (ता. करवीर) येथील एका वृध्दास दोषी ठरवून जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. चंद्रकांत दत्तात्रय पेंडूरकर (५५) असे त्याचे नाव आहे.
खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, २०१६ मध्ये चंद्रकांत पेंडूरकर या वृध्दाने आपल्या नातीच्या वयाच्याच मुलीला गळा दाबून ठार मारीन अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यात पीडित मुलगी गर्भवती राहिली. त्यामुळे पीडितेच्या आईने करवीर पोलीस ठाण्यात अत्याचाराची तक्रार दिली. या प्रकरणाचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पुष्पलता मंडले यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांच्या न्यायालयात झाली. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील ॲड. अमृता पाटोळे यांनी काम पाहिले. त्यांनी तपासलेल्या सर्वच ११ साक्षीदारांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तीवादानंतर पेंडूरकरला जन्मठेपेची शिक्षा व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायाधीशांनी दिले. याकामात सरकारपक्षाला करवीर पोलीस ठाण्याचे पैरवी अधिकारी पोलीस कर्मचारी किरण माने, आर. डी. बंडगर, सहायक फौजदार एम. एम. नाईक यांचे सहकार्य लाभले. सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील अमृता पाटोळे यांनी काम पाहिले.
फोटो नं. ०६०२२०२१-कोल-चंद्रकांत पेंडूरकर (आरोपी)