कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे, आम्ही पोलीस आहोत तुमच्याजवळचे दागिने व रोकड रूमालात बांधून ठेवा, असे सांगून दोघा वृद्धांकडून सोन्याचे दागिने व रोख ५० हजार असा दोन लाख रुपयांचा मुद्देमाल तोतया पोलिसांनी लुटला. ताराबाई पार्क व देवकर पाणंद परिसरात रविवारी सकाळी या घटना घडल्या. शाहूपुरी व जुना राजवाडा पोलीस त्याची नोंद झाली आहे.देवकर पाणंद रोडवर सकाळी १०.१५ वाजण्याच्या दरम्यान घडला. सेवानिवृत्त अरुण संभाजी परीट (वय ६५ रा. श्रीकृष्ण कॉलनी, संभाजीनगर) हे फिरण्यासाठी निघाले असताना दुचाकीवरून थांबलेल्या दोघा तरुणांनी आम्ही पोलीस आहोत, तुम्हाला थांबण्याचा इशारा केला तरी तुम्ही का थांबला नाही? असा जाब विचारून त्यांच्या जवळील १ तोळ्याची अंगठी रुमालात बांधून देण्याच्या निमित्ताने ४० हजार रुपये किमतीची अंगठी लंपास केली. ही बाब त्यांच्या नंतर लक्षात आली.असाच ताराबाई पार्कात घडला. शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झालेले भगवान भैरू चौगुले (वय ७२ रा. हिंमत बहादूर परिसर,ताराबाई पार्क) हे सकाळी १०.३० वाजण्याच्या दरम्यान आदित्य कॉर्नर ते पितळी गणपती रोेडवरून चालत जात होते. एस. टी. वर्कशॉपजवळ दुचाकीवरून थांबलेल्या दोघा व्यक्तींनी त्यांना रस्त्यात अडवून आम्ही पोलीस आहोत.
पुढे तपासणी सुरू आहे, तुम्ही तुमच्या जवळचे दागिने काढून पिशवीत ठेवा, असे म्हणून त्याच्या जवळची पिशवी घेतली या पिशवीत चौगुले यांचे ५० हजार रुपये होते. रोख रक्कम व दीड तोळ्याची चेन, १ तोळ्याची अंगठी असा दीड लाख रुपयांचा मुद्देमाल पिशवीत ठेवण्याच्या बहाण्याने या तोतयांनी पळवून नेला.या दोन्ही घटनेतील संशयित एकच आहेत. त्यातील एकजण अंगाने जाड, पावणे सहा फूट उंच, दुसरा अंगाने सडपातळ साडेपाच फूट उंच आहेत. त्यांच्याकडे नंबरप्लेट नसलेली दुचाकी आहे. दोन्ही घटना एकाच टोळीने केल्याचे लक्षात येते. याप्रकरणी शाहूपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्याच लुबाडणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण कटकधोंड व प्रमोद जाधव तपास करत आहेत.