कोल्हापूर : पालकमंत्री सतेज पाटील यांनी जुन्या आणि नव्या पदाधिकाऱ्यांना पंधराव्या वित्त आयोगातील किती निधी द्यायचा याच्या स्पष्ट सूचना दिल्यानंतरही अजूनही पेच कायम असल्याचे चित्र जिल्हा परिषदेत दिसून येत आहे. त्यामुळे ‘जुन्या नव्याचा वाद मिटेना, वित्त आयोगाचा निधी सुटेना’ अशी स्थिती झाली आहे.
एप्रिल आणि जुलैमध्ये पंधराव्या वित्त आयोगाचा ९ कोटी ५३ लाखांचा निधी आला. त्याचे वाटप करण्याचे सूत्र लवकर ठरले नव्हते. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यालाही उशीर झाला. अखेर जुन्यांना निधी देण्याच्या बोलीवर राजीनामे घेण्यात आले. परंतु, अजूनही हा विषय संपलेला नाही. त्यामुळे अध्यक्ष राहूल पाटील यांनी पुन्हा पालकमंत्री पाटील यांची भेट घेतली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांच्या निधीमध्ये कपात केल्याशिवाय जुन्यांना निधी देता येणार नाही असे स्पष्ट झाले. त्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांच्या निधीला कात्री लावावी लागणार हे स्पष्ट झाले आहे.
परंतु, त्यानंतर अजूनही नवे-जुने यांच्यात या विषयावरून एकवाक्यता नाही. त्यामुळे याचे अधिकृत वितरण झालेले नाही. त्यातही जुन्या पदाधिकाऱ्यांपैकी प्रवीण यादव आणि स्वाती सासने यांना जादाचा निधी मिळण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येते. स्वाभिमानीच्या डॉ. पद्माराणी पाटील आणि शिवसेनेचे गटनेते हंबीरराव पाटील यांना मात्र जादा निधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानुसार हालचाली सुरू आहेत.
चौकट
बदलणाऱ्या कामांमुळे सर्वजण हैराण
अनेक सदस्यांना वित्त आयोगाच्या निधीतून कामे सुचविण्यासाठी गेल्या महिन्यात सांगण्यात आले. परंतु, तेव्हापासून अनेक सदस्यांनी पहिले दिलेले पत्र बदलून दुसरेच काम सुचविण्याचा सपाटा लावल्याने याबाबत निर्णय घेताना अध्यक्षांच्या दालनातील कर्मचारी हैराण झाल्याचे चित्र आहे. एकेका सदस्याने अशी चार चार पत्रे बदलून दिल्याने त्यांचे नेमके कोणते काम मंजूर करायचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट
वाढीव निधीमध्येही वाटा
ज्या जुन्या पदाधिकाऱ्यांना निधी वाढवून दिला जाणार आहे त्यातून आपली काही कामे होतात का यासाठीही काही सदस्य प्रयत्नशील आहेत. तर हे पदाधिकारी सर्वच्या सर्व निधी आपल्याच मतदारसंघामध्ये खर्च करण्यावर ठाम आहेत.