बुधवारी गारगोटीचा आठवडा बाजार होता. गारगोटी-गडहिंग्लज मार्गावर इंजुबाई मंदिराजवळ पोलिसांनी बुधवारी नाकाबंदी केली होती. गारगोटीतील सावंत कॉलनीतील निवृत्त वृद्ध शिक्षक पी. एल. कांबळे दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बाजार करून पायी घरी चालले होते. ते गारगोटी-गडहिंग्लज रस्त्यावरून जात असताना घुगरे मोटर गॅरेजनजीक पाठीमागून आलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांना अडवून आपण पोलीस असल्याचे सांगितले. पोलिसांची नाकाबंदी सुरू असून तुमची तपासणी झाली नाही का? असा सवाल करून हातरूमालची अज्ञाताने मागणी केली. त्या शिक्षकांनी हातरूमाल काढून त्याच्याकडे दिला. हातरूमालमध्ये अंगठी, चेन (साखळी) टाका असे सांगितले. यावेळी सर्व सोने आणि खिशातील पैशाची चिल्लरही शिक्षकाने टाकली. त्यानंतर चोरट्याने रूमालची गाठ मारून रूमाल बाजाराच्या पिशवीत टाकल्याचे दर्शविले. घरात गेल्यानंतर बाजाराच्या पिशवीमधील हातरूमालातील सोन्याची पाहणी केली असता चेन व अंगठी आढळून आली नाही. फसलो गेल्याचे लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले व आपली फिर्याद दाखल केली.
पोलिसानेच सोने लंपास केल्याच्या चुकीच्या अफवेमुळे तालुक्यात एकच खळबळ माजली. अज्ञात चोरट्याच्या या धाडसाने पोलीस खातेही चक्रावले आहे. सायंकाळच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी भेट दिली.