कोल्हापूर : अंबाबाई मंदिरातील दानपेटीत चलनातून काढून टाकलेल्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटांचे चक्क बंडल गुरुवारी आढळून आले. नोटाबंदीनंतर या नोटा जवळ बाळगणेही गुन्हा आहे. घरी किंवा व्यवसायात कुठेतरी शिल्लक राहिलेले हे बंडल काय करायचे, असा प्रश्न पडल्यावर त्या भक्ताने ते देवीच्या चरणी आणून दान केले असण्याची शक्यता आहे.
परंतु जे चलन आता व्यवहारातच नाही ते देवीला अर्पण करून भक्तीला बटा लावू नका, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
अंबाबाई मंदिरातील गेल्या सोमवारपासून सुरू असलेली द्विमासिक देणगी मोजमापाचे काम गुरुवारी संपले. मागील दोन महिन्यात देवीच्या खजिन्यात एक कोटी ४८ लाख रुपयांची भर पडली. देवीच्या मंदिरात एकूण नऊ दानपेट्या आहेत. मार्चअखेर असल्यामुळे देवस्थानच्या सुमारे ४० कर्मचाऱ्यांची मदत घेऊन ही देणगी मोजण्यात आली.
कोरोना लॉकडाऊनपूर्वी सरासरी ८० लाख रुपये देणगी पेटीत जमा होत होते. आता मंदिरे खुली झाल्याने भाविकांची गर्दी वाढल्याने देणगीचाही ओघ वाढला असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.