प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : तब्बल १८१ वर्षांची परंपरा लाभलेल्या ‘जुना बुधवार पेठ तालीम’ मंडळाने सामाजिक स्तरावर विविध प्रकारचे उपक्रम राबवत ‘माणुसकी जपणारी तालीम’ अशी ओळख प्रस्थापित केली आहे. तसेच कुस्तीसह विविध क्रीडाप्रकारांतही आपले नाव सर्वदूर पोहोचविले आहे.पंचगंगेच्या काठावर १८३८ मध्ये स्वातंत्र्यपूर्वकाळात जुना बुधवार पेठेत या तालमीची स्थापना झाली. तालमीच्या परिसरात सर्व जातिधर्मांचे नागरिक आजही गुण्यागोविंदाने राहतात. स्थापनेपासून सामाजिक बांधीलकी जपलेल्या या तालमीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते प्रत्येक नागरिकाच्या सुख:-दु:खात धावून जातात.स्वातंत्र्यपूर्वकाळात तालमीने क्रांतिकारकांना नेहमीच आसरा दिला. स्वातंत्र्यसंग्रामात क्रांतिसिंह नाना पाटील, नागनाथअण्णा नायकवडी, जी. डी. लाड, रत्नाप्पाण्णा कुंभार, दत्तोबा तांबट, हिवारे, आदी क्रांतिकारकांनी भूमिगत अवस्थेत तालमीच्या परिसरात आश्रय घेतला होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत तालमीचे पैलवान कै. शंकरराव तोरस्कर यांनी हौतात्म्य पत्करले आहे. प्रश्न कोल्हापुरातील टोलचा, खंडपीठाचा असो किंवा मराठा समाज आरक्षणाचा असो; यासारख्या सामाजिक प्रश्नांवर तालमीचे कार्यकर्ते प्रत्येक आंदोलनात पुढे असतात.२६ जानेवारी २०१८ रोजी शिवाजी पुलावरून नदीत कोसळलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर्समधील प्रवाशांना तालमीच्या कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच्या वेळी जिवाची पर्वा न करता पाण्यात उड्या घेऊन जीवदान दिले. आॅगस्टमध्ये आलेल्या महापुरामध्ये पूरग्रस्त भागातील नागरिकांची तालमीमध्ये राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पूर ओसरल्यानंतर प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तू देऊन कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. सामाजिक बांधीलकी जपत सर्व नागरिकांसाठी नाममात्र मानधनावर तालमीचे सभागृह उपलब्ध करून दिले जाते. जुना बुधवार तालीम ही हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. मुख्य इमारतीमध्ये झिमझिमसाहेबांचे जागृत देवस्थान आहे. तालमीतर्फे मोहरम, त्र्यंबोली यात्रा, गणेशोत्सव हे सण मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात.१९८५ सालापासून तालमीच्या पुढाकाराने पंचगंगा नदीवर दीपोत्सव साजरा केला जातो. दरवर्षी त्यामध्ये वाढ होत आहे. खेळांसोबत परिसरातील मुलांना अभ्यासाची गोडी लागावी यासाठी तालमीमध्ये अभ्यासिका सुरू केली होती. तिचा लाभ घेऊन परिसरातील अनेकजण वकील, डॉक्टर, इंजिनिअर, शासकीय नोकरदार झाले आहेत.सर्व क्रीडाप्रकारांत अव्वलतालमीची कुस्तीपरंपरा मोठी आहे. पूर्वी तालमीमध्ये पै. आनंदराव डांगे, राजाराम वरुटे, पांडुरंग पाटील, शंकरराव तोरस्कर, यशवंतराव पाटील, रंगराव पाटील, गणपतराव दिंडे, महादेव कुंभार, दगडू पाडळकर, दादू वरेकर, विष्णुपंत हांडे, महादेव वरेकर, सखाराम दिंडे, विजयसिंह गायकवाड, माजी खासदार उदयसिंह गायकवाड, माजी आमदार संजयसिंह गायकवाड, नारायण जाधव, वसंत पाटील, इब्राहिम मुल्ला, नारायण पाटील यांचा समावेश होता. आॅल इंडिया विद्यापीठ चॅम्पियनशिप मिळविलेले बाळ बोडके हे याच तालमीचे. पूर्वी गुढीपाडव्यानिमित्त सायकल स्पर्धा होत असे. बुधवार पेठ तालीम ते केर्ली असा तिचा मार्ग असायचा. त्यामध्ये अन्य जिल्ह्यांतील सायकलपटू सहभागी होत असत. म्हशींच्या शर्यती घेतल्या जात असत. वैशिष्ट्य म्हणजे म्हशींच्या शर्यतीची रनिंग कॉमेंट्रीसुद्धा ऐकविली जायची. ही कॉमेंट्री कै. बाबूराव ढेरे करीत असत. बैलगाडीच्या शर्यतीमध्ये तालमीच्या परिसरातील बैलगाड्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. १९६५ साली तालमीचा फुटबॉल संघ नावारूपाला आला. तेव्हापासून फुटबॉल संघाने आजही दबदबा कायम ठेवला आहे. प्रभाकर डांगे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या अवनी सावंत आणि ऋग्वेदा दळवी यांनी राज्य आणि राष्ट्रीय स्तरांवरील जलतरण स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. नेमबाजीत मंजिल हकमी, बाळासाहेब पीरजादे, कुणाल मिस्त्री या युवकांनी यश मिळविले आहे. आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक महेश कदम येथीलच. अॅथलेटिक्समध्ये राजू माने यांनी भरीव कामगिरी केली आहे. हॉकीमध्ये विकास जाधव, जिम्नॅस्टिकमध्ये प्रतीक्षा शेखर, तृप्ती पाटील यांनी उल्लेखनीय यश मिळविले. आयर्नमॅनचा बहुमानही उत्तम फराकटे यांनी मिळविला आहे.कागदाच्या लगद्यापासून २१ फुटी गणेशमूर्तीतालमीने अनेक ज्वलंत विषयांवर तांत्रिक देखावे सुरू केले. तालमीने गणेशोत्सवादरम्यान विविध विषयांवर सामाजिक प्रबोधन केले. १९७७ साली कागदाच्या लगद्यापासून बनविलेली शहरातील पहिली २१ फुटी मूर्ती तालमीतीलच आदिनाथ भणगे यांनी बनविली होती. भारत-चीन युद्ध, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी इंदिरा गांधी यांनी केलेल्या भाषणाच्या प्रसंगावर हलता देखावा, तुका जाई वैकुंठाला आणि रेड्यामुखी वेद, मी शिवाजी पूल बोलतोय हे देखावे सादर केले. तत्कालीन खासदार सदाशिव मंडलिक यांनी त्याची दखल घेऊन नवा पूल बांधण्यासाठी प्रस्ताव दिला. अशा विविध नागरी समस्या व सामाजिक समस्यांवर आधारित देखावे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून साकारून या तालमीने सामाजिक बांधीलकी दाखवून दिली.
१८१ वर्षांची परंपरा जपणारे ‘जुना बुधवार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 12:27 AM