आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. ११ : शासनाने जुनी पेन्शन योजना व कुटूंब निवृत्ती वेतन बंद करुन नवीन अंशदायी निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक ठरणाऱ्या या योजनेविरोधात रविवारी (दि.१६) महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने परिवार निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, गगनबावडा रोडवरील फुलेवाडी नाक्याजवळ असलेल्या अमृत मल्टीपर्पज हॉलमध्ये सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या मेळाव्यासा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार उपस्थित राहणार आहेत. शासनाने १ नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रुजु झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना १९८२ ची मुळची पेन्शन योजना बंद करुन डीसीपीएस व एनपीएस या अत्यंत तकलादू व वार्धक्याच्या काळात जगण्याचा मार्ग खडतर करणाऱ्या योजना लागू केल्या आहेत. सेवेत असताना मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांना त्या योजनेचा कोणताही लाभ होणार नाही त्यामुळे त्यांचे कुटूंब उध्वस्थ होणार आहेत. या योजनेची कोणतीही स्पष्टता नसल्याने कार्यवाहीबद्दलही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे ही योजना रद्द करुन पून्हा १९८२ सालची जूनी पेन्शन योजनाच लागू करण्यात यावी अशी मागणी या मेळाव्यात करण्यात येणार आहे. सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी राज्य कार्याध्यक्ष सर्जेराव सुतार, संदिप पाडळकर, तुषार पाटील, राहूल कांबळे, विकास चौगुले, निलेश कारंडे, मारुती फाळके व सतिश रणशिंगे उपस्थित होते.
१९८२ ची जुनी पेन्शन योजनाच लागू करण्याची ज्येष्ठांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 6:44 PM