बेळगाव - भारतीय हवाई दलातील सर्वात जुन्या विमानांपैकी एक असणारे हॉवर्ड T 6 G 2 हे विमान बेळगावच्या विमानतळावर दृष्टीस पडले. पहिल्यांदाच आलेल्या या विंटेज विमानाला बेळगाव विमानतळावर पाण्याच्या फवाऱ्यासह वॉटर सॅल्यूट देण्यात आला.
1947 पासून हे विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात आहे. दोन आसनी क्षमता असणारे हे विमान मागील अनेक वर्षांपासून सेवा देत आहे. रविवारी हे विमान इंधन भरण्यासाठी बेळगाव विमानतळावर दाखल झाले होते. बेळगाव विमानतळावर विंटेज विमान पहिल्यांदाच दाखल झाल्याने त्या विमानाचे वॉटर सॅल्यूटने स्वागत करण्यात आले. त्यामधून आलेल्या वैमानिकांचे विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांनी स्वागत केले.