कोल्हापूर : शहरातील काही भागात दुषित पाणी व कित्येक ठिकाणी अपुरा पाणी पुरवठ्यामुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. येत्या काळात जर पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. तर गलथान कारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना महिला शिवसैनिक काळे फासल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. असा इशारा शुक्रवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने महापालिकेसमोर पाणी प्रश्नासंबधी आयोजित केलेल्या आंदोलनप्रसंगी देण्यात आला.माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढण्यासाठी थेट पाईप लाईनच्या माध्यमातून प्रयत्न केले. त्यातही प्रशासनाने चुकीचे मार्गदर्शन करीत अज्ञान सिद्ध केले. सद्य स्थितीत शहरात ठराविक ठिकाणी दुषित पाणी व अपुरा पाणी पुरवठा केला जात आहे. तर काही ठिकाणी दिवसातील २४ तास पाणी पुरवठा केला जात आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनास जाब विचारला तर निरुत्तर होते. कोणावरही जबाबदारी ढकलून हात झटकले जात आहेत. नागरीकांची दिशाभुल करून माजी नगरसेवकांना बदनाम केले जात आहे. याबाबत त्वरीत कार्यवाही करून पाणी पुरवठा सुरळीत करावा. अन्यथा पाणी पुरवठा विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांना महिला शिवसैनिक तोंडाला काळे फासल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. पाणी पुरवठा विभागअधिकारी व प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणांनी परिसर दणाणला. यादरम्यान शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेत महापालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. बंदोबस्तावरील पोलिसांनी प्रवेशद्वारावर आंदोलकांना अडविले. अडविल्यानंतर कार्यकर्त्यांनी तेथेच सोबत आणलेल्या घागरींसह ठिय्या मारला. याबाबतचे निवेदन जल अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी स्विकारले.
यावेळी जिल्हा प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, बहुजन परिवर्तन पार्टीचे बाजीराव नाईक, शहर संघटक विशाल देवकुळे, माजी नगरसेवक नियाज खान, माजी नगरसेविका प्रज्ञा उत्तुरे, महिला उपसंघटक स्मिता सावंत, प्रिती क्षीरसागर, दत्ता टिपुगडे, शशिकांत बीडकर, राजू जाधव, युवासेना अधिकारी मंजित माने, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.