कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तिळवणीच्या ग्रामस्थांनी शुक्रवारी साडेचार तास महावितरणचे प्रवेशद्वार बंद करून अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोंडले. अखेर नवीन पंपहाऊसला डीपी बसवण्याची तयारी दर्शविल्यानंतर पात्री साडेसात वाजता ग्रामस्थ येथून उठले. त्यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती.गेले दोन दिवस तिळवणीचे सरपंच सूरज पाटील आणि सदस्यांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले आहे. १४ गावांच्या पाणी योजनेतून तेरा गावे बाहेर पडली आणि त्यांचे एकूण अडीच कोटी रुपयांचे बिल तिळवणी ग्रामपंचायतीला आले आहे. ते भरल्याशिवाय नवीन पंप हाऊसला वीजजोडणी देणार नसल्याचे ‘महावितरण’ने स्पष्ट केल्याने ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. दुसरीकडे शासनाने वीज बिल माफ केल्याच्या यादीत या योजनेचा समावेश नसल्याने अडचणीत भर पडली.त्यामुळे पहिल्या दिवशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु ठोस आश्वासन देण्यात चव्हाण यांना मर्यादा होत्या. त्यामुळे गुरुवारीही उपोषण सुरूच राहिले. काहीजणांच्या तब्येती बिघडल्या.खासदार धैर्यशील माने यांनी शुक्रवारी सकाळी उपोषणस्थळी भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे हे जिल्हा परिषदेत आले आणि त्यांनी चव्हाण यांच्याशी चर्चा केली. दुपारी एकनंतर तिळवणीच्या ग्रामस्थ आणि महिलांनी महावितरणसमोर ठिय्या मारला.याच दरम्यान माजी आमदार राजीव आवळे, माणगावचे सरपंच राजू मगदूम, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव माने, भैय्या माने यांनी उपोषणस्थळी भेट दिली. याबाबत कावळे यांच्याशी चर्चा सुरू केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला हा प्रश्न राज्य पातळीवरच सुटू शकतो अशी भूमिका घेतल्याने आंदोलक संतप्त झाले. त्यानंतर चारच्या सुमारास महिलाही आक्रमक झाल्या आणि त्यांनी महावितरणच्या प्रवेशद्वारालाच टाळे ठोकले. घोषणाबाजी सुरू केली.यानंतर पुन्हा खासदार माने यांच्या निवासस्थानी चर्चा झाल्यानंतर नव्याने उभारण्यात आलेल्या पंपहाऊसला जिल्हा नियोजनमधून मिळणाऱ्या निधीतून डीपी उभारून देण्याची ग्वाही कावळे यांनी दिल्यानंतर महावितरणाच्या समोरून ग्रामस्थ उठले. तोपर्यंत अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही बाहेर पडता आले नाही.आज नेतेमंडळी येणारमुंबईहून अधिवेशनातून सर्व नेतेमंडळी आज कोल्हापूरला येणार असून ती उपोषणस्थळी भेट देण्याची शक्यता आहे. एकीकडे राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचे थकीत वीज बिल माफ झाले असताना तिळवणीलाही याचा फायदा झाला पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली असून याबाबत मुंबईतील बैठकीतही निर्णय होणार असल्याचे सांगण्यात आले.
थकित वीजबीलापोटी उपोषण, तिळवणीच्या संतप्त ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना कोंडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2023 11:42 AM