कोल्हापूर : जिल्हा पोलीस दलात अखंडपणे सेवा बजावत असताना निवृत्तीच्या अखेरच्या दिवशी ११ जणांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित केला. दरम्यान, पोलीस दलातील तीन पोलीस उपनिरीक्षक, ११ श्रेणी पोलीस उपनिरीक्षक, ११ सहायक फौजदार, तीन हवालदार, दोन पोलीस नाईक असे एकूण ३० जण मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांचा पोलीस दलाच्यावतीने पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात अलंकार हॉलमध्ये सत्कार केला.
सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी व अंमलदार यातील बहुतांश अधिकारी व अंमलदार यांनी ३० वर्षापेक्षा जास्त व जास्तीत-जास्त ३९ वर्षे पोलीस दलात कर्तव्य बजावत सन्मानाने सेवानिवृत्त होत असल्याचा आनंद दिसून येत होता. अनेकांनी सेवेतील चांगला, कटू अनुभवाबाबत मनोगत व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी मनोगतात, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपल्या परिवाराला वेळ देत स्वत:चे छंद जोपासावे, आरोग्याकडे लक्ष द्यावे, सेवानिवृत्तीनंतर मिळणारे फंड, वेतनाचे नियोजन करुन आयुष्य चांगले जगावे असे आवाहन केले. यावेळी पोलीस उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचलन पो. नि. तानाजी सावंत यांनी केले. मदतनीस म्हणून पोलीस सुनील जांभळे यांनी कामकाज केले.
अखेरचा दिवस आनंदाचा...
सेवानिवृत्ती होणाऱ्या ११ सहायक फौजदारांना श्रेणी उपनिरीक्षक या पदावर मान्यता दिली. त्यामध्ये मनोहर कोळी, महादेव कोळी, संजय खारगे, सतीश मोरे, रमेश हजारे, राजन कांबळे, मनोहर खणगावकर, राजू थोरात, तानाजी कुदळे, बळवंत चौगुले व महादेव पाटील यांचा समावेश होता. अखेरच्या दिवशी बढती मिळाल्याने विशेष आनंद झाल्याचे त्यांनी मनोगतात सांगितले.
९१ जणांना उपनिरीक्षकपदी बढत्या
जिल्हा पोलीस दलातील ८० सहायक पोलीस उपनिरीक्षक यांनी विहीत निकष पूर्ण केल्याने त्यांनाही दि. १ जूनला श्रेणी पोलीस उपनिरीक्षकपदी बढती दिली. यांच्यासह एकूण ९१ श्रेणी पोलीस उपनिरीक्षकांना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी मान्यता दिली.