कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जाच्या पहिल्या दिवशी हातकणंगलेमधून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे दादासाहेब चवगोंडा ऊर्फ डी. सी. पाटील यांनी अर्ज भरून निवडणुकीचे बिगुल वाजवले. कोल्हापूरमधून एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. मात्र २७ जणांनी ७० उमेदवारी अर्ज नेले. हातकणंगलेमधून ३६ जणांनी ६७ उमेदवारी अर्ज नेले.आज व उद्या सुटी आहे, त्यामुळे सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. सोमवार व मंगळवार हे दोन दिवस जिल्ह्यातील प्रमुख उमेदवार अर्ज सादर करतील. अर्ज दाखल करण्याची मुदत १९ एप्रिलपर्यंत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवारपासून प्रारंभ झाला. कोल्हापूर मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे व हातकणंगले मतदारसंघासाठी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर उमेदवारी अर्ज नेण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या दिवशी कोल्हापूरमधून २७ जणांनी ७० उमेदवारी अर्ज नेले तर हातकणंगलेतून ३६ जणांनी ६७ उमेदवारी अर्ज नेले. हातकणंगलेमधून वंचित बहुजन आघाडी पक्षाचे दादासाहेब चवगोंडा पाटील यांनी पहिल्या दिवशी अर्ज सादर केला. सोमवार व मंगळवार या दोन दिवशी जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांसह अन्य उमेदवार अर्ज सादर करतील.
आज, उद्या व १७ तारखेला अर्ज नाहीआज शनिवार, रविवार हे सुटीचे दिवस आहेत. बुधवारी (दि. १७) श्रीरामनवमीची सुटी आहे. या तीनही दिवशी उमेदवारी अर्ज भरून घेतले जाणार नाहीत. त्यामुळे प्रमुख उमेदवार सोमवार, मंगळवारी अर्ज भरणार आहेत. अर्ज दाखल करताना खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी २५ हजार, तर राखीव गटातील उमेदवारासाठी साडेबारा हजार अनामत रक्कम आहे.