कोल्हापूर : आंदोलन अंकुश संघटनेच्या पुढाकारातून शेतकऱ्यांच्या पैशांतून शिरोळ येथे महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा उभा केला असून, या काट्याची धास्ती साखर कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे या परिसरातील कारखान्यांनी वजनकाटे अचूक ठेवल्याने हंगामात शेतकऱ्यांची किमान ७७ कोटींची लूट वाचल्याचा दावा संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी केला आहे.उसाची काटामारी नवीन नाही, याबाबत शेतकरी संघटनांच्या वतीने अनेक वेळा आवाज उठवला आहे. पण, सगळी यंत्रणा साखर कारखान्यांच्या हातात असल्याने फारसे यश हातात आले नाही. यासाठी ‘आंदोलन अंकुश’ने काटा उभारण्याचा निर्णय घेतला. नृसिंहवाडी येथील रामचंद्र गेंडे यांनी स्वत:ची जमीन दिली, तर शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन ३३ लाखांचा वजनकाटा उभारला. या काट्यामुळे भागातील दत्त, गुरुदत्त, जवाहर, शरद, पंचगंगा व सांगलीतील दत्त इंडिया या साखर कारखान्यांचे एकूण गाळप हे ५० लाख टनापेक्षा जास्त झाले आहे. २० टनांच्या दोन ट्रॉलीच्या सरासरी १ टन उसाची काटामारी व्हायची. मात्र, येथे काटा बसवल्यानंतर सगळ्याच कारखान्यांनी काटे अचूक करून घेतले आहेत.हंगामात २,६०० ऊस वाहनांचे मोफत वजनहंगामात या काट्यावर २,६०० ऊस वाहनांचे मोफत वजन करून दिले. त्यामध्ये, सीमा भागातील काही कारखान्यांच्या वजनात तफावत आढळली.‘इंडिकेटर’वरूनच थेट वजन पावती द्यावीसर्वच कारखान्यांचे वजनकाटे डिजिटल आहेत. मात्र, ऑनलाइन नसल्याने वजनात फेरफार करता येतो. यासाठी शासनाने सर्व्हरच्या नियंत्रणाखाली काटे आणले तर छेडछाड निदर्शनास येते. त्यामुळे इंडिकेटरवरुनच थेट वजन पावती द्यावी, अशी मागणी चुडमुंगे यांनी केली.इंडिकेटरला संगणक जोडण्याचा आदेश घातकलोडसेल ते इंडिकेटरपर्यंतच्या केबलना कोणतेही छुपे उपकरण जोडू नये, त्याचबरोबर इंडिकेटरला संगणक जोडून पावती देऊ नये, असा आदेश नियंत्रक वैधमापन शास्त्र विभागाचे डॉ. रवींद्र सिंगल यांनी नाेव्हेंबर २०२२ला काढला. हा आदेश कारखान्यांना अडचणीचा असल्याने त्यांची बदली झाली आणि डॉ. सुरेश मेकला यांनी ही अटच रद्द केली. हे घातक असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.
Kolhapur: ‘आंदोलन’च्या वजनकाट्याने ऊस वजनचोरीवर ‘अंकुश’; शेतकऱ्यांच्या पैशातून उभा केला महाराष्ट्रातील पहिला वजनकाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 11:57 AM