कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात यंदा देवीचा नवरात्रोत्सव जल्लोषात साजरा करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर मंदिरातील स्वच्छतेला आज, सोमवार, दि.२३ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. दरम्यान, शनिवारी गरुड मंडपाची संपूर्ण जागा संपूर्णपणे मोकळी करण्यात आली. याच ठिकाणी मंडपाची प्रतिकृती तयार करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे आज, सोमवारी सकाळी १० वाजता उत्सवाच्या तयारीची पाहणी करण्यासाठी अंबाबाई मंदिराला भेट देणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनासाठी दरवर्षी या काळात २५ लाखांवर भाविक येतात.यंदा नवरात्रोत्सव ३ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या उत्सवाला अवघे १२ दिवस राहिल्याने सर्वत्र तयारी सुरू आहे. मंदिराच्या सफाई कर्मचाऱ्यांकडूनच साफसफाई सुरू आहे. शिखरांची रंगरंगोटी यापूर्वीच केलेली आहे. दरम्यान, गेल्या दहा- बारा वर्षांपासून मुंबईतील संजय मेंटेनन्स या कंपनीकडून मंदिराची मोफत साफसफाई करून दिली जाते. आज, सोमवारी २० जणांचे हे पथक कोल्हापुरात दाखल होणार आहेत. दीपमाळेच्या स्वच्छतेपासून या सफाईला ते सुरुवात करतात. येत्या चार ते पाच दिवसांत ही सफाई पूर्ण होईल, अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष शिवराज नाईकवडे यांनी दिली.जिल्हाधिकारी आज पाहणी करणारदरम्यान, नवरात्रोत्सवातील अंबाबाई मंदिरात होणाऱ्या नऊ दिवसांच्या तयारीसाठी आज, सोमवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. यात सांस्कृतिक कार्यक्रमांची निश्चिती करण्यात येणार आहे. तत्पूर्वी, ते सकाळी १० वाजता अंबाबाई मंदिर परिसराला भेट देणार असून, उत्सवाच्या तयारीची स्वत: पाहणी करणार आहेत.
पूजेच्या साहित्याची पुढच्या आठवड्यात स्वच्छतानवरात्रोत्सवानिमित्त वर्षातून एकदा अंबाबाईच्या पूजेत वापरल्या जाणाऱ्या साहित्याची स्वच्छता केली जाते. ही स्वच्छता पुढील आठवड्यात सुरू करण्यात येणार आहे. कोल्हापुरातील सराफ व्यावसायिक व कारागीर ही सेवा मोफत देतात. यामध्ये नगरप्रदक्षिणेसाठीचे चांदीचे सिंहासन, चौरंग, चौऱ्या- मोर्चेल, तसेच नैवेद्याचे ताट, कटांजन, आरतीचे ताट, घंगाळ, वाट्या, तांबे, तोरण, चोपदार दंड यांचा समावेश असतो.