कोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या सातव्या दिवशी बुधवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाई महाप्रत्यांगिरा देवीच्या रुपात अवतरली. अथर्व वेदामध्ये या देवतेचा उल्लेख आहे. बुधवारीदेखील अंबाबाई दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.बुधवारी दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची सालंकृत पूजा बांधण्यात आली. आपण केलेल्या कोणत्याही कार्याची विपरीत फळे मिळत असतील किंवा आपल्यावर केलेले अभिचार, निराशा, पिशाच्चबाधा, शत्रृबाधा दूर करण्यासाठी तसेच अपयश, नैराश्य नष्ट करून किर्ती, वैभव पून: प्राप्त करण्यासाठी महाप्रत्यांगिरी देवीची उपासना ही शीघ्र फलदायी आहे.
आपल्या उपासकावर शटकर्म केल्यास देवी त्या बाधेचे निराकरण करते. भक्तांची सुरक्षा करते. ही कर्म भोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता असून तिला नारसिंही असेदेखील म्हणतात. ही देवी चतुर्भूज असून मुख सिंहाचे (नारसिंहासारखे) आहे. ही पूजा श्रीपूजक विद्याधर मुनीश्वर, अरुण मुनीश्वर, सचिन गोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली.