समीर देशपांडे -- कोल्हापूरबारा वर्षे कोल्हापुरातील संगीत रसिकांना जुन्या हिंदी-मराठी गीतांची रसग्रहणासह मेजवानी देणाऱ्या लिसनर्स क्लबचा ‘स्मृतिगंध’ पुन्हा एकदा दरवळणार आहे. चार वर्षे हा कार्यक्रम स्थगित केला होता. पुन्हा एकदा आज, रविवारपासून हा कार्यक्रम सुरू होत आहे. निवृत्त प्राध्यापक श्रीकृष्ण कालगावकर हे संगीत समीक्षक. त्यांच्याकडे जुन्या ध्वनिमुद्रिकांचा मोठा संग्रह. २००० मध्ये संगीतकार नौशाद यांनी त्यांच्या येथील घरी हा संग्रह पाहण्यासाठी भेट दिली होती तेव्हा त्यांच्याशी झालेल्या गप्पांमधून प्रेरणा घेऊन लिसनर्स क्लबची स्थापना केली. एलआयसीमधील अधिकारी धनंजय कुरणे यांच्याकडेही गाण्यांच्या चार हजार जुन्या रेकार्डस् आहेत. त्यांना लेखक प्रभाकर तांबट यांची साथ मिळाली आणि स्मृतिगंध कार्यक्रमाची सुरुवात झाली. संगीताच्या रसग्रहणावर आधारित असा हा कार्यक्रम आहे. गाण्यातील सौंदर्यस्थळे समजावून घेऊन नंतर ते गाणे ऐकले तर त्याचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीने घेता येतो. या कार्यक्रमात कोणी गाणे म्हणत नाही किंवा कोणी कुठलेही वाद्य वाजवत नाही. सुरुवातीला एखादे गाणे घेऊन त्याचे गीतकार कोण आहेत, कशा परिस्थितीत त्यांनी गीतलेखन केले, संगीतकार कोण, संगीत देताना घडलेल्या काही घटना, कोणत्या रागातील ते गाणे आहे अशा सर्व बाजूंनी रसिकांना माहिती दिली जाते. त्यानंतर मग ती ती गाणी ऐकवली जातात. त्यामुळे रसिकांना वेगळाच आनंद मिळतो. स्मृतिगंधने आतापर्यंत विविध विषय घेऊन ७१ कार्यक्रम सादर केले आहेत. प्रसिद्ध गायक, संगीतकार यांच्या कार्यक्रमांशिवाय हुस्नलाल-भगतराम, श्यामसुंदर, खेमचंद प्रकाश अशा अनवट विषयांवरही कार्यक्रम सादर केले आहेत. शिवाजी विद्यापीठ रोडवरील खरे मंगल कार्यालयामध्ये हे कार्यक्रम होत असत. चार वर्षांपूर्वी काही कारणांमुळे हा कार्यक्रम थांबविला. मात्र, आग्रहामुळे हा कार्यक्रम पुन्हा रूजू होत आहे. ‘भारत बंद’वेळीही झाली होती मोठी गर्दीसंगीतकार नौशाद यांच्या गीतांवरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि अचानक काही तरी दुर्दैवी घटना घडल्याने ‘भारत बंद’ची हाक दिली गेली. सर्व व्यवहार बंद झाल्याने रसिक श्रोते येणार नाहीत अशी अटकळ होती; परंतु ‘भारत बंद’ असतानाही तीनशेपेक्षा अधिक रसिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली....अन् जागा अपुरी पडलीसंगीतकार शंकर जय-किशन यांच्यावरील खास कार्यक्रमांचे आयोजन स्मृतिगंधने केले होते. राजकपूर यांच्या बहुतांशी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलेले. त्यामुळे अनेक लोकप्रिय गीते त्यांच्या नावावर. परिणामी रसिकांची मोठी गर्दी या कार्यक्रमासाठी झाली. जागा अपुरी पडल्याने अखेर रस्त्यावर लोकांनी उभे राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. ग्रामोफोनचा वापरअतिशय जुनी गाणी ही ग्रामोफोनच्या तबकडीवर असल्याने या कार्यक्रमात ग्रामोफोन आणला जातो. त्यावर ही जुनी गीते ऐकवली जातात. त्यामुळे या ठिकाणी वेगळाच माहोल तयार होतो.
पुन्हा एकदा लिसनर्स क्लबचा ‘स्मृतिगंध’ दरवळणार
By admin | Published: January 22, 2017 12:50 AM