कोल्हापूर : कोरोना, एसईबीसी आरक्षण या कारणांमुळे चार वेळा पुढे ढकलण्यात आलेली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) विविध पदांसाठीची संयुक्त पूर्वपरीक्षा रविवारी कोल्हापुरातील ४१ उपकेंद्रांवर पार पडली. या केंद्रांवरून कोरोनाबाबतची आवश्यक ती दक्षता घेऊन एकूण ९,७८६ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. ३,६९६ जणांनी परीक्षेला दांडी मारली. झाली एकदाची परीक्षा, अशी प्रतिक्रिया बहुतांश परीक्षार्थींनी व्यक्त केली.
तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलीस निरीक्षक, आरटीओ आदी वर्ग एक आणि दोनच्या पदांसाठी ‘एमपीएससी’च्या वतीने परीक्षा घेण्यात आली. कोल्हापुरातील केआयटी कॉलेज, न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, आदी ४१ केंद्रांवरील ५६३ वर्ग खोल्यांमध्ये रविवारी सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५, अशा दोन सत्रांत परीक्षा झाली. पहिल्या सत्रात १०० प्रश्नांचा दोनशे गुणांचा सामान्य ज्ञान विषयाचा, तर दुसऱ्या सत्रात ८० प्रश्न आणि दोनशे गुणांचा सी-सॅट विषयाचा पेपर झाला. त्यासाठी सकाळी ७.३० वाजेपासून केंद्रांवर परीक्षार्थी येऊ लागले. काही जण पालकांसमवेत आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गनने परीक्षार्थींचे तापमान तपासून, मास्क असल्याची खात्री करून, प्रवेशपत्र पाहून, त्यावरील क्यूआर कोड मोबाइलद्वारे स्कॅन करून विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात आला. ज्या परीक्षार्थींजवळ मास्क, सॅनिटायझर नव्हते, त्यांना ते प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. दोन्ही पेपर होण्यापूर्वी आणि झाल्यानंतर वर्गखोल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. परीक्षा केंद्रांमध्ये पोलीस बंदोबस्त होता. गेल्या अकरा महिन्यांत चार वेळा लांबणीवर पडलेली परीक्षा अखेर झाल्याने त्याबाबतचा आनंद परीक्षार्थींच्या चेहऱ्यावर दुसरा पेपर सुटल्यानंतर दिसून आला.
चौकट
परीक्षार्थी ताटकळत
शहरातील गर्ल्स हायस्कूल या केंद्रावर सकाळी ८.३० वाजेपासूनच परीक्षार्थी रांगेत उभे होते. त्यांची रिपोर्टिंगची वेळ ८.३० ते ९.३० होती. मात्र, प्रवेशपत्रावरील क्यूआर कोड स्कॅन करण्यात तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे वेळेत येऊनही अर्ध्या तासाहून अधिक वेळ परीक्षार्थींना रांगेत ताटकळत उभे राहावे लागल्याचे सांगत काही पालकांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली.