कोल्हापूर : बसंत बहार रोड येथील ट्रेझरी शाखेच्या एटीएम सेंटरमध्ये हातचालाखीने एटीएमची आदलाबदल करून परप्रांतीय चोरट्याने वन विभागातील कर्मचा-यास दीड लाखांचा गंडा घातला. हा प्रकार लक्षात येताच भिवाजी कृष्णा देवणे (वय ५८, रा. तांदूळवाडी, पो. सुळे, ता. पन्हाळा) यांनी मित्रांच्या मदतीने चोरट्याचा शोध घेऊन कागल येथील एका पेट्रोल पंपावर त्याला पकडले. सोनुकुमार पंचानंद सनगही (वय २८, रा. अमरपूर, जि. भागलपूर, बिहार) असे चोरट्याचे नाव असून, त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
वन विभागातील कर्मचारी भिवाजी देवणे हे सोमवारी (दि. २२) दुपारी दोनच्या सुमारास ट्रेझरी शाखेच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यावेळी एटीएम सेंटरमध्ये असलेल्या एका तरुणाने दोनपैकी एक एटीएम मशीन बंद असल्याचे सांगितले. त्यानंतर पैसे काढण्यासाठी मदत करतो असे सांगून त्याने देवणे यांच्या एटीएम कार्डचा पासवर्ड पाहिला. बाहेर पडताना हातचालाखीने त्याने देवणे यांचे एटीएम कार्ड घेऊन त्याबदल्यात दुसरे कार्ड दिले.
दुस-या दिवशी बँकेत जाऊन पासबूक भरून घेतल्यानंतर खात्यातील पैसे कमी झाल्याचे देवणे यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी बँकेतील अधिका-यांना विचारणा केल्यानंतर विविध ठिकाणचे एटीएम सेंटरमधून पैसे काढल्याचे आणि ऑनलाईन खरेदी केल्याचे लक्षात आले. खिशातील एटीएम कार्डची तपासणी केल्यानंतर त्यांना फसवणुकीचा प्रकार लक्षात आला.
एटीएमची आदलाबदल करून निघून गेलेल्या व्यक्तीची माहिती देवणे यांनी काही मित्रांना दिली. ते स्वत:ही त्याचा शोध घेत होते. बुधवारी दुपारी संशयित चोरटा कागल येथील एका पेट्रोल पंपावर आल्याची माहिती एका मित्राने देवणे यांना दिली. मित्रांनी संशयित चोरट्याला थांबवून ठेवले. त्यानंतर तातडीने देवणे यांनी कागलमध्ये जाऊन त्याची झडती घेतली असता, खिशात एटीएम कार्ड मिळाले. त्याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात देऊन फिर्याद दिली. संशयितावर गुन्हा दाखल केला असून, अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.