कोल्हापूर : लसीकरण नंतर दुसऱ्या दिवशी दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या लसीकरणात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत जमावाने सदर बाजारातील आरोग्य केंद्राची जमावाने आज, सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास तोडफोड केली.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सदर बाजारातील दीड वर्षाच्या मुलाला शुक्रवारी (दि.३०) प्राथमिक आरोग्य केंद्रात लस दिली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि.१) त्या मुलाचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी असा जाब विचारत जमावाने प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय पथकाच्या चुकीमुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत त्यांनी दवाखान्यावर हल्ला केला. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील साहित्य, खिडक्यांच्या काचा, बैठक व्यवस्थेसाठीची खुर्ची, टेबल आणि इतर साहित्याची जमावाकडून मोडतोड झाली.अचानक घडलेल्या या घटनेमुळे रुग्णालयात कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा थरकाप उडाला. घटनेनंतर तात्काळ शाहूपुरी पोलीस सदर बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आले. दरम्यान हल्लेखोर पसार झाले होते. पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.
लसीकरणानंतर दीड वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संतप्त जमावाने आरोग्य केंद्राची केली तोडफोड; कोल्हापुरातील घटना
By सचिन भोसले | Published: October 03, 2022 2:18 PM