कोल्हापूर : पुणे, मुंबईसह उत्तर भारतातही कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे कोल्हापुरातून रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांनी नको दिल्ली, नको मुंबई असे म्हणत थेट आरक्षणासह तिकीट रद्द करण्यास प्राधान्य दिले आहे. त्यामुळे दिवसाकाठी सव्वादोनशेहून अधिक प्रवासी आरक्षण रद्द करीत आहेत.
कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधून एकेकाळी १६ रेल्वे गाड्यांची ये-जा होती. त्यातून हजारो प्रवाशांची ये-जा होत असे. परंतु, कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर केवळ सहा विशेष रेल्वे या स्थानकावरून सुटतात व पुन्हा येतात. हीच परिस्थिती कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतरही कायम आहे. नियमित दहा हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. मात्र, पुन्हा कोरोनाची लाट आल्यानंतर प्रवासी संख्या रोडावली. त्यामुळे दिवसभरात आता पाच हजार प्रवासी या पाच रेल्वेतून प्रवास करतात. मुंबई, पुणेसह उत्तर प्रदेश, बिहार, आदी राज्यांमध्ये कोरोनाचा विस्फाेट झाल्यानंतर कोल्हापुरातून जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही रोडावली. त्यातून रोज १५० हून अधिकजण तिकटे, तर २३० हून अधिकजण आरक्षण रद्द करीत आहेत.
मुंबई, दिल्लीला जाणाऱ्यांची गर्दी ओसरली
राज्याची राजधानी आणि देशाची अर्थिक राजधानी मुंबईमध्ये पश्चिम महाराष्ट्रातून कामानिमित्त जाणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यात रेल्वेने प्रवास सुखकर होतो म्हणून रेल्वेला अधिक पसंती लोक देतात, तर देशाची राजधानी दिल्लीतही सर्वोच्च न्यायालयातील खटले व अन्य कामांसाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र. या दोन्ही ठिकाणी कोरोनाचा विस्फोट झाल्यानंतर जाणाऱ्यांची संख्या आपोआप मंदावली. दिल्लीत जाणारी निजामुद्दीन एक्स्प्रेस रद्द झाली आहे. मुंबईला जाणारी पूर्वीची महालक्ष्मी व आताची कोल्हापूर-मुंबई स्पेशल रेल्वे सुरू असून, त्याला प्रवाशांचा प्रतिसाद कमी झाला आहे.
- रोज रेल्वेतून प्रवाशांची संख्या : सुमारे ५०००
- रोज जाणाऱ्या रेल्वे - ६
- आरक्षण रद्द करण्याची रोजची संख्या - २३०
- तिकिटे रद्द करणाऱ्यांची संख्या -१५०
विशेष रेल्वेची गर्दी रोडावली
पूर्वीच्या कोयना, महाराष्ट्र, तिरूपती, महालक्ष्मी आणि धनबाद याऐवजी कोल्हापूर-मुंबई स्पेशल (रोज), कोल्हापूर-गोंदिया स्पेशल (रोज), कोल्हापूर-मुंबई स्पेशल (रोज), कोल्हापूर तिरूपती (स्पेशल, रोज), कोल्हापूर-धनबाद स्पेशल (बुधवारी आगमन, तर शुक्रवारी दिक्षाभूमी ने रवाना), कोल्हापूर-नागपूर स्पेशल(सोमवारी, शुक्रवारी), या सहा विशेष रेल्वे कोल्हापुरातून धावतात.
कोट -
मुंबईसह उत्तरेतील कोरोना संसर्ग वाढल्यामुळे छत्रपती शाहू टर्मिनन्स स्थानकातून तिकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या रोडावली आहे. दिवसभरात आगावू आरक्षण व तिकिटे रद्द करण्याचे प्रमाण वाढले आहे.
- ए. आय. फर्नांडीस,
स्थानकप्रमुख
छत्रपती शाहू टर्मिनन्स, कोल्हापूर.
(रेल्वे प्रवाशांचा संग्रहित फोटो वापरणे.)