कोल्हापूर : पावसाळ्यापूर्वी गेले दीड महिने शहरात एकीकडे महास्वच्छता मोहीम सुरू आहे. त्यामार्फत नाले, मैदाने सफाई होत असताना दुसरीकडे रविवारी झालेल्या एकाच पावसातच संपूर्ण शहर तुंबल्याचे विदारक चित्र समोर आले. महास्वच्छता मोहिमेमुळे नाल्याचे पात्र रुंदावले असले तरीही एका पावसातच संपूर्ण शहर तुंबले. सफाई मोहीम चांगली असली तरीही काही तांत्रिक बाबींकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम असल्याचे खुद्द प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे. अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने गटर्स चॅनल बांधल्याने पावसामुळे तुंबून पाणी रस्त्यावर आले आहे.महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पदभार घेतल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात जयंती नाला गाळ व कचरामुक्त करून त्याला नदीचे मूळ स्वरूप आणण्याचा कौतुकास्पद प्रयत्न केला. महास्वच्छता चळवळ उभा केली, प्रतिसादही मिळाला आहे. जयंती नाल्यातील गाळ, कचरा तसेच लहान-मोठे नालेसफाई करून सुमारे ९०० टनांहून अधिक कचरा उचलला. पण, रविवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते, भाजी मंडई, मैदाने, सखल भागात पाणीच पाणी झाले. दुसऱ्या दिवशीही पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.एकाच पावसामुळे लक्ष्मीपुरी भाजी मार्केट, व्हीनस कॉर्नर चौक, कोंडा ओळ चौक, रामानंद नगर नाला परिसर, लिशा हॉटेल परिसर, पार्वती मल्टिप्लेक्स, आदी परिसरासह शहरातील मैदाने जलमय झाली. गेले दीड महिना स्वच्छता मोहीम सुरूअसूनही शहर का तुंबले? असा सर्वसामान्यांतून प्रश्न उपस्थित होत आहे.लिशा हॉटेल परिसरात तर चक्कगटर्स चॅनलवर बांधकाम झाल्याने पावसात त्याचे पाणी रस्त्यावर येऊन तुंबते. आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलकडून आलेले चॅनल पुढे नेण्याऐवजी काही वजनदार व्यक्तींनी ते रस्ता क्रॉस करून थेट पार्वती मल्टिप्लेक्सपासून पुढे नेले आहे. त्यामुळे या परिसराला तळ्याचे स्वरूप येते. व्हीनस कॉर्नर चौकात दोन वर्षांपूर्वी चेंबर बांधल्याने तेथील नाल्याचे पाणी बाहेर येणे बंद झाले, पण सखल भागामुळे चेंबरमधून रस्त्यावर येऊन तुंबले. हीच स्थिती अनेक ठिकाणी आहे.नगरसेवकांनी चॅनल फिरवलीअनेक ठिकाणी नगरसेवकांनी आपले वजन प्रभागात वापरून नवीन चॅनल गटर्स बांधली, त्यासाठी तांत्रिक बाबींचा विचार न करता फक्त आपल्या प्रभागाचाच विचार केल्याने मुसळधार पावसानंतर हे पाणी बाहेर रस्त्यावरून वाहू लागल्याचे चित्र दिसते. त्यामुळे पाणी रस्त्यावर येऊन त्याचा निचरा झाला नाही.लक्ष्मीपुरी तुंबलीबिंदू चौक पार्किंग परिसरात चुकीच्या पद्धतीने चॅनल केल्याने पावसात ते ‘ओव्हर फ्लो’ होऊन लक्ष्मीपुरी भाजी मार्केटमध्ये शिरते, ही बाजारपेठ दोन्हीही बाजूंनी सखल असल्याने मुख्य बाजारपेठेलाच नाल्याचे स्वरूप येते. त्यात रविवारी आठवडी बाजाराचा दिवस असल्याने दुपारपर्यंत भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर टाकलेला भाजी-पाल्याचा कचरा थेट चॅनलमध्ये अडकल्याने पाण्याचा निचरा झाला नाही, त्यामुळे लक्ष्मीपुरी तुंबल्याचे चित्र निर्माण झाले.रामानंदनगरात नाल्यात बांधकामेरामानंदनगर नाल्याच्या पात्रात काहींनी अतिक्रमण करून बांधकाम केली असल्याने येथे पुलाजवळच पात्र अरुंद बनले आहे, परिणामी पावसाचा जोेर वाढल्याने नाला तुंबतो व पाणी रस्त्यावर येते. या नाल्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणतीही ठोस पावले का उचलली जात नाहीत, याचे कोडे अनेकांना उलगडलेले नाही.