जयसिंगपूर : चिपरी (ता. शिरोळ) येथे मोपेडवरून बेकायदेशीर जिलेटीन कांड्यांची वाहतूक करीत असताना बबन कोंडिबा पोटघन (वय ४०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, चिपरी) या तरुणाला पोलिसांनी पकडले. तर दीपक वडर (रा. पेठवडगाव) हा पळून जाण्यात यशस्वी झाला. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई जयसिंगपूर पोलिसांनी केली असून, यामध्ये मोपेडसह ४९ हजार ७४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. त्यामध्ये २३६ जिलेटीन कांड्यांचा समावेश आहे.
चिपरी गावामध्ये मोठ्या प्रमाणात जिलेटीन कांड्यांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची माहिती खबऱ्याकडून जयसिंगपूर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण दीडवाघ यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी दुपारी दीडच्या सुमारास चिपरी गावात जाणाºया रस्त्यावरती सापळा रचला व ये-जा करणाºया वाहनांची तपासणी करीत असताना आदिनाथ मगदूम यांच्या घरासमोरील मार्गावर संशयित आरोपी मोपेडवरून आले होते. दरम्यान, पोलिसांकडून तपासणी होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संशयित पोटघन व वडर पळू लागले. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून बबन पोटघन याला पकडले, तर दीपक वडर हा पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईत पोलिसांना चिपरी येथील संशयित पोटघनच्या घरामध्ये २०० जिलेटीन कांड्या तसेच वाहतूक करीत असलेल्या इलेक्ट्रिक डेटोनेटर्सच्या ८० कांड्या व जिलेटीनच्या ३६ कांड्या मिळून आल्या. या कारवाईमध्ये बजरंग माने, पोलीस नाईक साजिद कुरणे यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.