कोल्हापूर : घरगुती गॅस सिलिंडरमधून बेकायदेशीररित्या वाहनात गॅस भरण्याची साधन सामग्री बाळगणाऱ्या संशयिताला जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून इलेक्ट्रिक वजनकाटा, इलेक्ट्रिक मोटार, पाईप, रेग्युलेटर, दोन घरगुती गॅस सिलिंडर असा मुद्देमाल जप्त केला. संभाजीनगर ते शहाजी वसाहतमार्गे जाणाऱ्या एका शेडमध्ये ही कारवाई करण्यात आली. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री सुरु होते.
महिलेची आत्महत्या
कोल्हापूर : कळंबा परिसरात महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. कांचन सचिन खोत (वय २८, बुध्याहाळकरनगर) असे आहे. याची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली.
मटका घेतल्याप्रकरणी दोघे संशयितांना अटक
कोल्हापूर : मंगळवार पेठेतील राधाकृष्ण मंदिर व कळंबा रिगंरोडवरील चिव्याचा बाजार परिसरात अशा दोन ठिकाणाहून दोघांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. कुलदीप लांबोरे (वय ३७, मंगळवार पेठ), रवींद्र सदाशिव सुतार (वय ६२, उत्तरेश्वर पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, मंगळवार पेठेतील राधाकृष्ण मंदिर परिसरात एका बंद पानपट्टीच्या आडोशाला संशयित कुलदीप हा उघड्यावर कल्याण मटका घेत असल्याचे दिसून आले. त्याच्याकडून ४५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या प्रकरणात नवीन वाशी नाका ते साई मंदीर कळंबा या मार्गावरील चिव्याचा बाजार परिसरात रवींद्र सुतार हा संशयित कोऱ्या कागदावर आकडे लिहत बसलेला आढळला. त्यांच्याकडे चौकशी करता एका बुकी मालकाकडे दहा टक्के कमिशनवर काम करीत असल्याचे सांगितले. दोन्ही प्रकरणात या दोघा संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली.