कोल्हापूर : बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकास पोलिसांनी अटक केली. दिलीप मारुती पाटील (वय ४१, रा. पिंपळे तर्फ सातवे पैकी बांबरवाडी, ता. पन्हाळा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी एक पिस्तूल, एक जिवंत राऊंड व मोबाईल संच असा सुमारे ५५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वाघबीळ ते पन्हाळा मार्गावर एका मद्य दुकानासमोर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आज, मंगळवारी ही कारवाई केली.याबाबत माहिती अशी की, दिलीप पाटील यांच्याकडे बेकायदेशीर गावठी बनावटीचे पिस्तूल होते. तो हे पिस्तूल विक्रीसाठी वाघबीळ ते पन्हाळा मार्गावर बांबरवाडी गावच्या हद्दीत येणार असल्याची गोपनीय माहिती पथकाचे पोलीस अंमलदार संदीप कुंभार यांना मिळाली. त्यानुसार पोलीस पथकाने त्या परिसरात सापळा रचून पाटील यास ताब्यात घेतले. त्याला जप्त मुद्देमालासह पन्हाळा पोलीस ठाण्यात हजर केले.ही कामगिरी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे प्रमुख पो. नि. प्रमोद जाधव, उपनिरीक्षक विनायक सपाटे तसेच अंमलदार सुनील कवळेकर, अजय वाडेकर, संदीप कुंभार, अमोल कोळेकर यांनी केली.
गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एकास अटक, सुमारे ५५ हजाराचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2022 6:55 PM