कोल्हापूर : काडीपेटी दिली नाही या कारणांवरून पाठलाग करून चाकू हल्ल्यात प्रणव प्रवीण पंडत (वय २० रा. ८७६ सी वॉर्ड, लक्ष्मीपुरी) याला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शाहुपुरी पोलिसांनी सुयश गणेश कारंडे (वय २० रा. शाहुपुरी ५ वी गल्ली) याला अटक केली. रविवारी दुपारी शाहुपुरी कुंभार गल्लीतील पंचमुखी गणेश मंदिर शेजारी हा चाकू हल्ला घडला होता.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रणव व त्याचा मित्र हे दोघे व्हिनस कॉर्नर चौकातील दुकानात औषध आणण्यासाठी गेले. तेथे संशयित सुयश कारंडे सह तिघे जण तेथे आले, त्यांनी प्रणव याच्याकडे काडेपेटी मागितली. त्याने नाही असे सांगितले. त्याचा राग आल्याने कारंडेसह तिघांनी प्रणव व त्याच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांनंतर त्यांचा पाठलाग करून पंचमुखी गणेश मंदिर शेजारी प्रणव पंडत याच्यावर चाकूहल्ला केला. त्यात तो गंभीर जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी संशयित हल्लेखोर सुयश कारंडे याला अटक केली.