कोल्हापूर : राज्यात होणा-या पोलिस भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना एकाच जिल्ह्यातून आणि कोणत्याही एकाच घटकात सहभागी होता येणार आहे. एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज भरलेल्या उमेदवारांनी कोणताही एक जिल्हा निवडून पोलिस अधीक्षक कार्यालयात हमीपत्र द्यावे, अशी सूचना गृह खात्याने दिली आहे.राज्यात सुमारे १७ हजार पोलिसांची भरती प्रक्रिया होत आहे. यासाठी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले आहेत, असे गृह विभागाच्या निदर्शनास आले आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्याने भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात. यातून प्रतीक्षा यादीतील काही विद्यार्थ्यांचे नुकसान होते. असा धोका टाळण्यासाठी उमेदवारांना कोणत्याही एकाच जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जाणार आहे.यासाठी एका जिल्ह्याची निवड करून तसे हमीपत्र उमेदवाराने तो राहत असलेल्या जिल्ह्यात पोलिस अधीक्षक कार्यालयात द्यावे, अशी सूचना प्रशिक्षण व खास पथके विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. हमीपत्र भरण्याची अंतिम मुदत १७ मे पर्यंत आहे. त्यानंतर येणारे अर्ज बाद होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पोलिस भरतीसाठी एकाच जिल्ह्यातील प्रक्रियेत सहभागी होता येणार; हमीपत्र देण्याची उमेदवारांना सूचना
By उद्धव गोडसे | Published: May 13, 2024 3:03 PM