पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्या एकास जिवाची पर्वा न करता दोघा होमगार्डंनी पाण्यातून बाहेर काढत प्राण वाचवले. इंगळी येथील घरातील साहित्य आणण्यासाठी ओढ्याच्या पाण्यात दुचाकी घालण्याचे धाडस या व्यक्तीने केले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहात दुचाकी घसरल्याने हा प्रकार शुक्रवारी रात्री उशिरा घडला. यावेळी तेथे उपस्थित असणारे होमगार्ड दीपक सुतार आणि श्रीपती कांबळे यांनी प्रसंगावधान दाखवत त्याचे प्राण वाचविले.
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे इंगळी येथील ग्रामस्थ स्थलांतर करत होते. पट्टणकोडोली येथील ओढ्यालाही मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. रस्त्यावर सुमारे चार फूट पाणी आले होते. या पाण्यातूनच संसारोपयोगी साहित्य बाहेर काढण्यासाठी इंगळीतील ग्रामस्थांची धडपड चालली होती. शुक्रवारी रात्री उशिरा ओढ्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग वाढला होता. यावेळी इंगळी येथील एकाने साहित्य आणण्यासाठी या पाण्यामध्ये दुचाकी घातली. मात्र पाण्याच्या वेगाने दुचाकी घसरुन हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जात होता. हा प्रकार तेथे उपस्थित असलेले होमगार्ड दीपक सुतार आणि श्रीपती कांबळे यांच्या लक्षात येताच त्यांनी लगेचच या पाण्यात धाव घेत त्या वाहत जाणार्यास पाण्यातून खेचून बाहेर काढले. यावेळी मनसे शहरअध्यक्ष रवींद्र आडके यांनीही मदत केली.
२४ पट्टणकोडोली होमगार्ड
फोटो ओळ : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील ओढ्याच्या पाण्यात वाहून जाणाऱ्यास होमगार्ड यांनी जिवाची पर्वा न करता बाहेर काढले.