लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : एकीकडे पाच, दहा लाख रुपयांच्या निधीसाठी धावपळ करणाऱ्या जिल्हा परिषदेत दलित वस्तीचा एक कोटी रुपयांचा निधी आता शासन जमा होणार आहे. दोन वर्षांपूर्वीची मंजूर कामेच सुरू न केल्याने हा निधी परत जाणार आहे. ही कामे न होण्यासाठी ग्रामसेवकापासून जे कोणी जबाबदारी असतील, त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेत बुधवारी समाजकल्याण समितीची बैठक पार पडली. अध्यक्षस्थानी सभापती स्वाती सासने होत्या. यावेळी सदस्य सुभाष सातपुते, कुरणे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे प्रत्यक्ष तर अन्य सदस्य ऑनलाइन उपस्थित होते. या बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा झाली. यानंतर या नोटिसा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या चार वर्षांत कोल्हापूर जिल्हा परिषदेत दलित वस्तीच्या निधीवरून आरोप, प्रत्यारोप बरेच झाले. पदाधिकाऱ्यांनी यातील निधी आपल्याच मतदारसंघात जादा कसा येईल, असेही प्रयत्न केले. परंतु मंजूर झालेली कामे पूर्ण झाली की नाही, झाली असली तरी काय दर्जाची झाली आहे, हे पाहण्याची तसदी कोणतेच लोकप्रतिनिधी घेत नाहीत.
जिल्ह्यातील सन २०१९-२० मधील ४५ कामे आता रद्द झाली आहेत. अजूनही गडहिंग्लज, हातकणंगले आणि कागल या तीन मोठ्या तालुक्यांतील किती कामे सुरू झाली नाहीत याची आकडेवारी समाजकल्याण विभागाकडे नाहीत. हे आकडे आल्यानंतर शासन जमा होणारी रक्कमही वाढणार आहे. दरम्यान विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता पावसाळ्यानंतर लगेच लागू शकते, तेव्हा तातडीने नव्या लाभार्थ्यांचे अर्ज मागवून निवड प्रक्रिया सुरू करण्याबाबत सासने यांनी सूचना केली.
चौकट
खरोखरच कामांची गरज आहे का?
काम मंजूर झाल्यानंतर हा निधी खर्च करण्यासाठी दोन वर्षांची मुदत असतानाही जर ही कामे सुरू झाली नसतील किंवा पूर्ण झाली नसतील तर खरोखरच तेथे कामांची गरज आहे का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
चौकट
वैयक्तिक लाभाच्या योजनांना मुदतवाढ नाही
गेल्यावर्षीच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून ग्रामस्थांनी १ कोटी ९ लाख रुपयांच्या अनुदानाचे साहित्य खरेदी केले. मात्र ५३ लाख रुपये अनुदान अजूनही शिल्लक आहे. अनेक लाभार्थ्यांनी साहित्य खरेदी केले नसल्याने जुन्या लाभार्थ्यांना मुदतवाढ न देता ही शिल्लक रक्कम या वर्षीसाठी खर्च करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. कडबा कुट्टी ७, मुलांची सायकल ९१, मुलींची सायकल ७३, टॅब ५६, झेरॉक्स मशिन ३१, शिलाई मशिन १३७, पीको फॉल मशिन ७९, दळणयंत्र ६३ इतक्या लाभार्थ्यांनी साहित्य घेतलेले नाही.