कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून जिल्हा प्रशासनाला कोरोना उपाययोजनांसाठी एक कोटीचा निधी देण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.जिल्ह्यात कोरोनाचा समूह संसर्ग होत असून, रोज दोनशे-तीनशेच्या संख्येत रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी, आरोग्य साहित्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
यावेळी मंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी देसाई यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी एक कोटीचा निधी द्यावा, अशी विनंती केली.समितीने यापूर्वी जिल्हा प्रशासनाला ५० लाख आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी दीड कोटी असे दोन कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे वाढीव निधी देण्यासाठी न्याय व विधि खात्याची परवानगी घ्यावी लागेल, असे महेश जाधव म्हणाले. यावर मंत्री पाटील यांनी न्याय व विधि खात्याकडून समितीला कोणतीही अडचण येणार नाही, याची जबाबदारी आम्ही घेतो; तुम्ही तातडीने निधी वर्ग करण्याची कार्यवाही करा, असे सांगितले.
जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, तुम्ही हा निधी शासनालाच देणार आहात; त्यामुळे प्रश्न येणार नाही. त्यानंतर या चर्चेचे प्रोसीडिंग करण्यात आले. पुढील दोन दिवसांत हा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्यात येणार आहे. यावेळी समिती सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव उपस्थित होते.