कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या खजिन्यामध्ये वर्ष २०१८-१९ या कालावधीत एक कोटी १३ लाख ८६ हजार १४९ किमतीचे सोन्या-चांदीचे अलंकार जमा झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सोन्याच्या अलंकारात ८०० ग्रॅमची वाढ झाली आहे. तसेच समितीच्या उत्पन्नामध्येही एक कोटी ५६ लाख रुपयांची वाढ झाली आहे. यावर्षीचे एकूण उत्पन्न २२ कोटी ६१ लाख ५७ हजार ६५३ इतके असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.देवस्थान समितीच्या त्र्यंबोली येथील कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेस कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्या संगीता खाडे, शिवाजी जाधव, सचिव विजय पोवार उपस्थित होते.जाधव म्हणाले, देवस्थान समितीच्या अखत्यारीत असलेल्या अंबाबाई देवस्थान आणि श्री केदारलिंग (जोतिबा) देवस्थानाला दरवर्षी लाखो भाविक सोन्या-चांदीचे अलंकार अर्पण करतात. त्यात पाचू, खडे, हिरे, माणिक अशा अनमोल रत्नांचाही समावेश आहे.
दरवर्षी जमा झालेल्या अलंकारांचे मूल्यांकन जून-जुलै महिन्यांत केले जाते. त्यानुसार सन २०१८-१९ मध्ये देवीला अर्पण झालेल्या दागिन्यांचे मूल्यांकन १७ ते २० तारखेदरम्यान गरुड मंडपात करण्यात आले. शासनमान्य मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे, योगेश कुलथे, मिरज, उमेश पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली हे मूल्यांकन पार पडले.