कोल्हापूर : एका दिवसात वाहन चालविण्याचे लायसेन्स व वाहन खरेदी केल्यानंतर त्याचे आर. सी. बुक व वाहनाचा क्रमांक त्याच दिवशी सायंकाळपर्यंत वाहनचालकाच्या हाती थेट मिळणार आहे.या सोईची सुरुवात गुरुवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली. पहिल्याच दिवशी २४ जणांना वाहन चालविण्याचे परवानेही वितरित करण्यात आले.असा प्रायोगिक उपक्रम यापूर्वी कºहाड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू करण्यात आला आहे. तेथील उपक्रम सुरळीत झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी कोल्हापुरातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात करण्यात आली. त्यानुसार देशात प्रथमच गुरुवारी या कार्यालयात उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
अशा प्रकारची एकाच दिवसात सेवा देण्याची परवानगी या कार्यालयास राज्य शासनाने ‘झिरो पेंडन्सी’अंतर्गत दिली आहे. त्यानुसार जे नागरिक वाहन चालविण्याची चाचणी ज्या दिवशी देतील त्यांना थेट त्याच दिवशी सायंकाळपर्यंत लायसेन्स हातात दिले जाणार आहे. ज्यांना पोस्टाद्वारे हवे असेल त्यांना ते पोस्टाद्वारेही देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यापूर्वी हे लायसेन्स पोस्टाद्वारे १५ ते ३० दिवसांत घरपोच मिळत होते.या उपक्रमामुळे या कार्यालयाअंतर्गत रोज प्रत्येकी १५० वाहन चालविण्याचे परवाने व आर. सी. बुक त्याच दिवशी नागरिकांच्या हाती दिले जाणार आहेत.अशी मिळणार सेवावाहन परवाना ज्या-त्या दिवशी हातात मिळण्यासाठी प्रथम चाचणी, त्यानंतर सायंकाळपर्यंत आधारकार्ड सत्यप्रत ओळख पटवून नागरिकाला परवान्याचे स्मार्ट कार्ड दिले जाणार आहे. यासह नोंदणी झालेल्या नवीन वाहनाचे आर. सी. बुकही त्याच दिवशी वितरित केले जाणार आहे. त्याशिवाय वाहन नोंदणी केलेल्या दिवशीच अर्थात खरेदी केल्यानंतर२४ तासांत त्या ग्राहकांच्या फोनवर एसएमएसद्वारे वाहनाचा क्रमांकही पाठविला जाणार आहे. परवान्यावरील पत्ता बदलणे, नूतनीकरण केलेले आर. सी. बुक, वाहन लायसेन्सही त्याच दिवशी तत्काळ नागरिकांच्या हाती दिले जाणार आहे.
वाहनधारकांच्या सोयीसाठी एका महिन्यात ४० कॅम्पवाहनधारकांना तालुक्याच्या ठिकाणाहून पासिंग व लायसन्ससाठी शहरात येण्याचा त्रास वाचविण्यासाठी दररोज कॅम्प (शिबिर) भरविले जातात.पूर्वी महिनाभरात २२ शिबिरे भरविली जात होती. त्यात सुधारणा करत त्यांची संख्या ४० केली आहे.त्यानुसार इचलकरंजी -(सोम, मंगळ, गुरू, शुक्र) , जयसिंगपूर - दर बुधवारी, मलकापूर - पहिला व तिसरा सोमवार, वारणानगर -पहिला व तिसरा मंगळवार, मुरगूड - दुसरा व चौथा मंगळवार, गारगोटी - प्रत्येक बुधवारी, पेठवडगाव - पहिला व तिसरा गुरुवार, गडहिंग्लज - दर शुक्रवारी, चंदगड - पहिला व तिसरा शनिवार असे नियोजन करण्यात आले आहे.
झिरो पेंडन्सी अंतर्गत चाचणीच्या दिवशीच वाहन चालविण्याचे लायसेन्स वितरित केले जाणार आहे. यासह वाहन खरेदी केल्यानंतर तत्काळ त्या वाहनाचे आर. सी. बुक आणि वाहनाचा क्रमांक मोबाईलवर संदेशद्वारे दिला जाणार आहे. हा देशातील पहिलाच उपक्रम आहे.- अजित शिंदे, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर