येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय उपक्रमांतर्गत ‘आधुनिक शेतीच्या वाटा’ या विषयावरची एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळा झाली.
कार्यशाळेत अग्रणी उपक्रमांतर्गत एकूण १२ महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, समन्वयक, प्राचार्य, संशोधकांनी सहभाग नोंदविला.
यावेळी डॉ. चिकुर्डेकर म्हणाले, पारंपरिक शेतीबरोबर आधुनिक तंत्र पद्धतीने शेती करणे गरजेचे असून, पश्चिम महाराष्ट्रात औषधी व सुगंधी वनस्पतींची लागवड आणि रेशीम लागवडीला मोठ्या संधी आहेत.
प्रथम सत्रात औषधी व सुगंधी वनस्पती लागवड विषयातील संशोधक अभ्यासक प्रा. सत्यनारायण आर्डे यांनी पश्चिम महाराष्ट्रात साडेसात हजारहून अधिक वनौषधी वनस्पती असून, त्यांच्या पासून औषधे आणि सुगंधी द्रव तयार केले जाऊ शकते. शेतीपूरक व्यवसाय म्हणून वनौषधी वनस्पतींची लागवड आणि सुगंधी द्रव उत्पादनावर आधारित शेती गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ.आर.पी.कावणे यांनी ‘रेशीम उद्योग आणि व्यवस्थापन’ या विषयावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील ऊस पीक शेतीबरोबर रेशीम उद्योग व्यवसायासाठी पूरक वातावरण असून, शेतकऱ्यांनी अशा उद्योगाकडे लक्ष दिल्यास आर्थिक उन्नतीचा तो एक मार्ग ठरेल असे सांगितले.
समन्वयक डॉ.आर.एस. पांडव यांनी स्वागत केले. संयोजन सहायक प्रा. एन. बी. जाधव, डॉ.एस.एस. खोत, डॉ. संतोष जांभळे यांनी केले. डॉ.ए. आर. भुसणार यांनी आभार मानले.