कोल्हापूर : कडकडीत लॉकडाऊनच्या सलग दुसऱ्यादिवशी सोमवारी कोल्हापूर शहर शंभर टक्के बंद राहिले. कोरोना साखळी तोडण्याचा कोल्हापूरकरांनी निर्धार केला असल्याचे मिळालेल्या प्रतिसादावरून स्पष्ट झाले. कोणीही नागरिक विनाकारण रस्त्यावर आले नाहीत, तर आपल्यातील जागरुकपणाचे दर्शन घडवित, त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेत प्रशासनाच्या प्रयत्नांना मदत केली.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विस्फोट झाला असून संसर्गाची साखळी तोडण्याकरिता कडकडीत लॉकडाऊनशिवाय पर्याय उरलेला नव्हता. दोन-तीन दिवस आधी जिल्हा प्रशासन असो, की पालकमंत्री सतेज पाटील, की ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ असोत, सर्वांनीच जिल्ह्यातील नागरिकांना कडकडीत लॉकडाऊनची पूर्वकल्पना देऊन ठेवली होती. त्यामुळे जरुरीचे साहित्य तसेच जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेऊन ठेवणे शक्य झाले होते.
नागरिकांशी संवाद साधत, त्यांना पूर्ण विश्वासात घेत कडकडीत लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे गेल्या दोन दिवसात कोणाचीही कसलीही गैरसोय झालेली नाही. संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद असला तरीही नागरिकांना त्याचा जाच वाटलेला नाही. नागरिकांनीही अत्यंत संयमाने लॉकडाऊन पाळण्याचे ठरविले आहे. गेल्या महिन्यात संचारबंदी असूनही नागरिक खरेदीच्या निमित्ताने शहरात गर्दी करताना पाहायला मिळायचे. पण आता मात्र त्यांनी घरात कोंडून घेत लॉकडाऊन यशस्वी करण्याचा तसेच कोरोनाची साखळी तोडण्याचा निर्धार केला आहे.
सोमवारचा दिवस म्हणजे आठवड्याची सुरुवात असते, रस्त्यावर सर्वत्र वर्दळ, नागरिकांची रस्त्यावरील गर्दी, सरकारी, निमसरकारी कार्यालये, बँका, न्यायालये, खासगी आस्थापनांची कार्यालये फुल्ल झालेली असतात. परंतु कालचा सोमवार त्याला अपवाद ठरला. रस्त्यावर, तसेच सरकारी कार्यालयात असे चित्र कोठेच दिसले नाही. एरव्ही भाजी मंडईत झुंबड उडालेली असायची, गोंगाट असायचा. मात्र तेथेही सोमवारी नीरव शांतता होती. पोत्यांनी झाकलेल्या बुट्ट्या, त्यावर प्लास्टिकचे कागद आणि दगड ठेवलेले चित्र पाहायला मिळाले.
शहरातील सर्व प्रकारची दुकाने बंद होती. रस्त्यावरील फेरीवाले गायब होते. कोठेही कोणीही चोरून बसून सुध्दा भाजी विक्रीचा प्रयत्न केला नाही. चहाची टपरी नाही की पानाची टपरी सुध्दा कुठे उघडल्याचे दिसले नाही. रस्त्यावर केवळ सरकारी कार्यालयांत, रुग्णालयांत जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच काय ती तुरळक वर्दळ होती. बाकी सर्वसामान्य नागरिक कुठेही दिसला नाही. पेट्रोलपंप सुरू होते, परंतु तेथे केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच पेट्रोल देण्याचे बंधन असल्याने त्याठिकाणीही सामसूम होती. दोन दिवसापासून पंप चालकांच्या विक्रीत प्रचंड घट आली आहे.
गल्ली-बोळात मात्र क्रिकेट सुरू
दाट नागरी वस्ती असलेल्या गल्ली-बोळात लहान मुलांनी मात्र मस्तपैकी क्रिकेटचा डाव मांडल्याचे पाहायला मिळत होते. काही ठिकाणी बॅडमिंटन, तर काही ठिकाणी फुटबॉलही खेळला जात होता. सायंकाळच्या वेळी नागरिक आपापल्या दारात, गॅलरीत बसून गप्पा मारण्यातही व्यस्त असल्याचे दिसले.
करोडो रुपयांची उलाढाल ठप्प...
कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग, व्यापार, सराफ बाजारपेठ बंद असल्यामुळे करोडो रुपयांची उलाढाल ठप्प आहे. मे महिना हा लग्नसराईचा असतो, परंतु सलग दुसऱ्यावर्षीही मे महिना लॉकडाऊनमध्येच गेल्याने बाजारपेठेतील उलाढालीवर परिणाम झाला आहे.