पेठवडगाव- देवाळे : राष्ट्रीय महामार्गावरील मंगरायाचीवाडी फाट्याजवळ बुलेट मोटारसायकल रस्ता दुरुस्तीसाठी लावलेल्या सिमेंट व लोखंडी रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात एका २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास झाला.अविष्कार गोरख दाभाडे (वय २२, रा. काखे, ता. पन्हाळा) असे मृत युवकाचे नाव आहे, तर प्रताप गुलाब पाडवी (२० मूळ रा. जुगलखेत ता. अक्कलकुवा, जि. नंदुरबार) असे गंभीर जखमीचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत वडगाव पोलिसांत नोंद झाली नव्हती.अधिक माहिती अशी की : कोडोली येथील दाभाडे व पाडवी वर्ग मित्र आहेत. दोघेजण नर्सिंगचे शिक्षण घेत होते. पाडवी हा रात्री उशिरा कोल्हापुरात आला होता, त्याला आणण्यासाठी दाभाडे मोटारसायकलवरून गेला होता. कोल्हापूरहून परत येत असताना दाभाडे व पाडवी हे मोटारसायकल (एम एच ०९ जीएच- ४५८१) वरून वाठारच्या दिशेने चालले होते. मंगरायाचीवाडी फाट्यानजीक पेट्रोल पंपासमोर महामार्गाच्या सेवा रस्त्यावर सिमेंट व लोखंडी बॅरिकेटचा रस्ता दुभाजक करण्यात आला आहे.या रस्ता दुभाजकाला जोरात धडकली. या धडकेत अविष्कार जागीच ठार झाला, तर त्याचा मित्र प्रताप पाडवी हा गंभीर जखमी झाला. त्याला १०८ रुग्णवाहिकेतून जखमी अवस्थेत कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनास्थळी हवालदार रामराव पाटील, शैलेश विभूते, सतीश सुतार यांनी धाव घेत वाहतूक पूर्ववत केली. नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात विच्छेदन करून अविष्कारचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.