सांगली : भगवे ध्वज, टोप्या, पोस्टर्स, डिजिटल फलक, स्टिकर्स अशा विविध प्रसार साहित्यांनी मराठा क्रांती मोर्चाची जोरदार चर्चा सुरू आहे. संपूर्ण जिल्हा आणि शेजारील जिल्ह्यांतही त्यामुळे चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. साहित्य वाटपाचे शिस्तबद्ध नियोजनही सांगलीतील संपर्क कार्यालयातून सुरू आहे. राज्यभरात आजवर निघालेल्या मराठा क्रांती मोर्चांमध्ये समाजाच्या आंतरिक उर्मीमध्ये भगवे झेंडे, फलक, घोषवाक्य, स्टिकर्स, गांधी टोप्या अशा साहित्यानेही भर घातली आहे. सांगली शहरात येत्या मंगळवारी, २७ सप्टेंबर रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठीही साहित्याची रेलचेल आहे. क्रांती मोर्चाचे फलक घेऊन जिल्ह्यातील लाखो वाहने धावत आहेत. रिक्षा, कार, मालवाहू टेम्पो, ट्रक, दुचाकी यांच्यासह सायकलवरही छोटे स्टिकर्स झळकत आहेत. कारच्या मागील बाजूस असलेल्या मोठ्या काचेवर मोठे स्टिकर झळकवले जात आहेत. या साहित्याच्या माध्यमातून मराठा समाजाच्या भावना मांडल्या जात आहेत. क्रांती मोर्चासाठी समाजातील लोकांना येण्याचे आवाहनही केले जात आहे. मोर्चाची तारीख जवळ येत असताना, वातावरण निर्मितीच्या अनेक चांगल्या कल्पनांचा आविष्कार घडत आहे. केवळ धार्मिक कार्यक्रमात दिसणारी गांधी टोपी आता पुन्हा दिसू लागली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या निमित्ताने राबविल्या जात असलेल्या चळवळीत अनेकजण गांधी टोपी वापरत आहेत. गांधी टोपीवर रेडियमचा वापर करून एका बाजूला ‘एक मराठा..’ तर दुसऱ्या बाजूला ‘लाख मराठा’ हा मजकूर लिहिला आहे. संपर्क कार्यालयातून नियोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक लाख टोप्या तयार झाल्या असून मोर्चादिवशी त्यांचे वाटप केले जाणार आहे. शहरात शेकडो डिजिटल फलकही विविध घोषवाक्ये, आवाहन, तसेच माहिती देत मोर्चाच्या नियोजनाला हातभार लावताना दिसत आहेत. सांगलीतील संपर्क कार्यालयात दिवसभर जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते स्टिकर, पोस्टर नेण्यासाठी येत आहेत. मागणीच्या तुलनेत साहित्याची कमतरता जाणवत असल्याने, समाजातील अनेक लोकांनी स्वत: असे साहित्य तयार करून ते वाटण्यास सुरुवात केली आहे. मोबाईलवर लावता येण्यासारखे छोटे स्टिकरही तयार करण्यात आले असून जिल्ह्यातील हजारो तरुणांनी हे स्टिकर मोबाईलवर चिकटविले आहे. ४00 मुव्हेबल शौचालये आंदोलनकर्त्यांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या सुविधांबाबत चर्चा सुरू असतानाच, शहरात स्वच्छतागृहे, शौचालयांची संख्या अत्यंत कमी असल्याची बाब समोर आली. त्यामुळे महापालिकेने आता पुण्यातील एका संस्थेकडून ४00 मुव्हेबल शौचालयांची मागणी केली आहे. पार्किंगच्या ठिकाणी व अन्यत्र त्यांची व्यवस्था केली जाणार आहे. झेंड्यांची संख्या लाखावर जाणार : सध्या साठ हजार भगवे झेंडे सांगलीत उपलब्ध असले तरी, जिल्ह्यातून तसेच अन्य जिल्ह्यांतून येणाऱ्या समाजबांधवांकडूनही झेंडे आणण्यात येणार आहेत. त्यामुळे झेंड्यांची संख्या लाखावर जाण्याची शक्यता आहे. काळ्या वस्त्रांद्वारे निषेध कोपर्डी येथील घटनेच्या निषेधार्थ मराठा समाज मूक मोर्चा काढणार आहे. काळे वस्त्र परिधान करून मराठा समाजबांधव या घटनेचा निषेध व्यक्त करणार आहेत. सध्या स्वयंसेवी संस्था व अन्य लोकांच्या माध्यमातून पाच हजारावर टी शर्ट उपलब्ध आहेत. याशिवाय संयोजकांनी आवाहन केले आहे की, मोर्चात सहभागी होणाऱ्यांनी काळ्या रंगाचा पोषाख करावा.
एकच चर्चा, ‘मराठा क्रांती’ मोर्चा
By admin | Published: September 22, 2016 12:59 AM