कोल्हापूर : राज्य कामगार विमा योजनेचे (ईएसआयसी) शंभर बेडचे रूग्णालय दोन वर्षात कोल्हापुरात कार्यन्वित होईल. त्याचे काम सुरू असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सोमवारी येथे सांगितले. ताराबाई पार्क परिसरातील ईएसआयसी हॉस्पिटलमधील ५० बेडच्या अलगीकरण कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल प्रमुख उपस्थित होते. या शंभर बेडच्या रूग्णालयाच्या ४० कोटींच्या कामाला जानेवारीत केंद्र सरकारकडून मंजुरी मिळाली. अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेल्या रूग्णालयाचा आराखडा श्रममंत्रालयास सादर केला आहे. निविदा प्रक्रिया सुरू आहे. रूग्णालयाचे काम पूर्ण होण्यास दोन वर्षे लागणार आहेत. तोपर्यंत विमाधारकांना वंचित ठेवणे योग्य नसल्याने त्यांच्या किमान वैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त सात कोटींचा प्रस्ताव तयार करून केंद्र शासनाला सादर केला. त्याला मंजुरी आणि निविदा प्रक्रिया फेब्रुवारीत पूर्ण झाली.
कामाच्या पूर्ततेसाठी एक वर्षाचा कालावधी दिला होता. मात्र, कोविडचे संकट उभे राहिल्याने विशेष सूचना देवून ५० बेडच्या अलगीकरणाचे काम दोन महिन्यात पूर्ण केले असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले. या अलगीकरण कक्षाच्या उभारणीमुळे कोविड विरोधातील आपल्या लढ्यासाठी चांगली मदत होणार असल्याचे आयुक्त कलशेट्टी यांनी सांगितले. या अलगीकरण कक्षाचे उदघाटन खासदार मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले.