कोपार्डे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत करवीर तालुक्यात कोविड १९ विषाणूने थैमान घातले आहे. तालुक्यातील गावागावात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असून आतापर्यंत ४ हजार १६ व्यक्तींना लागण झाली आहे. यात मृत्यूदर वाढल्याने करवीर तालुक्याची हॉटस्पॉटच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.
१ एप्रिल ते १६ एप्रिलपर्यंत करवीर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या नगण्य येत होती. यानंतर ती झपाट्याने वाढू लागली आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना बाधितांच्या बरोबर मृतांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. कोरोनाबाधितांची दररोजची आकडेवारी दीडशे ते दोनशेच्या आसपास पोहोचू लागली आहे यातच मृतांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
तालुक्यात मे महिन्यात तर कोरोनाचा कहर सुरू झाला आहे. गेल्या १५ दिवसात ७८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज सहा ते सात कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद होत आहे. यामुळे करवीरचा मृत्यूदर ४ टक्क्यांवर पोहोचला आहे.
लसीकरणासाठी तालुक्यात २९ ठिकाणी सोय उपलब्ध केलेली आहे. पण लसीचा मागणीपेक्षा केवळ २० टक्केच कोटा मिळत असल्याने लसीकरण ठप्प झाले आहे. १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसच मिळेना झाली आहे. तर उपलब्ध लसीमधून केवळ ४५ वर्षांवरील लोकांना तेही दुसरा डोस घेणाऱ्यांंना प्राधान्य देण्यात येत आहे.
१ एप्रिलपासून कोरोनाचा लेखाजोखा. बाधित --३ हजार ९१६ मृत --- १०२ कोविड सेंटर -- ४ (शिंगणापूर ५७ बेड, डी सी नरके विद्यानिकेतन --१०० बेड,के.आय टी कॉलेज १०० बेड, गिरगाव)
प्रतिक्रिया
समूह संसर्गाचा धोका वाढला आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून जाहीर केलेल्या लॉकडाऊनसाठी लोकांनी सहकार्य करून गर्दी टाळावी तरच ब्रेक द चेनचा उद्देश सफल होईल.
राजेंद्र सूर्यवंशी (पंचायत समिती सदस्य)