राजू पाटील
प्रयाग चिखली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे, पाडळी या पूरबाधित गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. अन्यथा महापुराच्या काळात स्थलांतर करण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. महापुराच्या काळात आंबेवाडी, प्रयाग चिखली, वरणगे, पाडळी या गावांमधील बहुतांश भाग पाण्याखाली जातो. प्रयाग चिखलीला तर बेटाचे स्वरूप येते. त्यामुळे या गावांमधील लोक पावसाळ्यामध्ये नातेवाईक, मित्रमंडळी यांच्याकडे स्थलांतर करतात. प्रशासनाकडूनच सक्तीने स्थलांतर केले जाते. एका घरात तीस-तीस लोक एकत्र ठेवले जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा एका जागी अनेकांना आश्रय देणे धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे या गावांमधील लोकांचे विशेष बाब म्हणून लसीकरण करण्याची गरज आहे.
कोट : येणाऱ्या काळातील महापुराचा धोका लक्षात घेऊन स्थलांतरामध्ये येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी शासनाने विशेष बाब म्हणून पूरग्रस्त गावातील लोकांचे शंभर टक्के लसीकरण करावे. -केवलसिंग रजपूत, माजी सरपंच, चिखली