चंदगड : आमचा जीव धोक्यात घालून तुमची सोय करतोय, ते बघा. तुम्हाला आम्ही काय घरी बोलवायला जात नाही. त्यामुळे वाद न घालता पैसे द्या, असे वादाचे प्रसंग वडापवाला व प्रवासी वर्गात रोजच चंदगड-बेळगाव मार्गावर रोज घडत आहेत. त्यामुळे दुप्पट तिकिटाची रक्कम घेणाऱ्या वडापवाल्यांना कोण लगाम घालणार की त्यांच्याकडे नेहमीप्रमाणे कानाडोळा करणार, असा संतप्त सवाल प्रवासी वर्गातून केला जात आहे. चंदगडकर आरोग्य, शिक्षण, व्यापार, शेतीमाल खरेदी-विक्री याबाबतीत पूर्णपणे बेळगावशी जोडले गेले आहेत.
विविध कोर्सेससाठी अनेक विद्यार्थी दररोज बेळगावला ये-जा करत असतात. त्यातच चंदगड तालुक्यात सर्व सोयींनियुक्त असे हाॅस्पिटल नसल्याने आरोग्याच्याबाबतीत पूर्णपणे बेळगाववरच अवलंबून राहावे लागते. पण गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे चंदगड-बेळगावदरम्यान असलेली एसटी वाहतूक पूर्णपणे बंद होती. सध्या कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी सुधारल्यामुळे चंदगडपासून शिनोळीपर्यंत एसटी वाहतूक सुरू झाली आहे. पण ती पण अर्धवट असल्याने बेळगावला चोरट्या मार्गे जाण्यासाठी प्रवाशांना वडापचा आधार घ्यावा लागत आहे. पण वडापवाल्यांकडून मनमानी सुरू आहे. चंदगड-बेळगावदरम्यान एसटीसाठी ५० रुपये तिकीट दर होता. पण वडापवाल्यांनी मात्र प्रवाशांच्या अडचणींचा फायदा उठवत तो दर दुप्पट केला आहे. तसेच ते प्रवाशांसी उद्धट बोलत असल्यामुळे अनेक ठिकाणी वादाचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. दुप्पट तिकिटाची रक्कम घेऊनही सुरक्षित प्रवास नसल्याने या वडापवाल्यांवर कायद्याच्या बडगा कोणी उठविणार की नाही? अशा संतप्त प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहेत. तसेच वडाप गाडीतही क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरले जात आहेत. त्यामुळे दाटीवाटीने बसून जीवघेणा प्रवास करण्यापलीकडे गत्यंतर नसल्याचेही प्रवाशांचे म्हणणे आहे.
पोलिसांचा वरदहस्त आहे का ?
जीवघेणा प्रवास, दुप्पट तिकीट रक्कम असे असतानाही पोलीस मात्र याकडे कानाडोळा करताना दिसत आहेत. त्यामुळे वडापवाल्यांवर पोलिसांचा वरदहस्त असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
चोरटी वाहतूक
कोरोनामुळे चंदगड-बेळगावदरम्यान कनार्टक हद्दीत बाची, राकसकोप व अतिवाड येथे तपासणी नाके करण्यात आले आहेत. येथून आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्राशिवाय बेळगावात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे शिनोळीजवळून कोनेवाडीमार्गे वडापवाल्यांची चोरटी प्रवासी वाहतूक सुरू आहे. हे अंतर चंदगड-बेळगावपेक्षा केवळ ३ ते चार किलोमीटर अधिक आहे. तरीपण वडापवाले दुप्पट पैसे घेत आहेत. त्यामुळे वडापवाल्यांकडून प्रवाशांची सुरू असलेली लूट थांबवावी, अशी मागणी होत आहे.