कोल्हापूर : ‘कोरोना व्हायरस’चा परिणाम आॅर्केस्ट्रा पथकांवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम, थाटामाटातील विवाहाला प्रशासनाने बंदी घातली आहे.
नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे आॅर्केस्ट्रा, हलगीवादक, बँडबाजा पार्टीचे केलेले बुकिंग रद्द झाली आहेत. त्यामुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. शंभर वर्षांपूर्वी प्लेगच्या साथीवेळी जी स्थिती होती, तशीच स्थिती आता झाली असल्याची प्रतिक्रिया कलाकारांतून व्यक्त होत आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी नुकतेच यात्रा व जत्रांसह गर्दीच्या कार्यक्रमांना बंदी घातली. लग्न समारंभ, जाऊळ, बारसे असे कौटुंबिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी करण्यासही बंदी आहे. याचा परिणाम आॅर्केस्ट्रा, बँडबाजा पार्टी या व्यवसायांवर झाला आहे.शहरातील आॅर्केस्ट्राची स्थिती
- आॅर्केस्ट्रा कंपनी - ३५
- कर्मचारी - ८00
- बँडबाजा पार्टी - १५
- कर्मचारी - ४00
डॉल्बी बंदीनंतर मागणी वाढली होती. यानंतर महापुरावेळी व्यवसायावर परिणाम झाला. यावर्षी काहीतरी पदरात पडेल, असे वाटत असताना ‘कोरोना’मुळे कामे ठप्प झाली आहेत.आतिष कदम, न्यू महाराष्ट्र बँड, पापाची तिकटी, कोल्हापूर
१२५ वर्षांत प्रथमच अशी स्थिती आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयात बसून आहे. बुकिंग केलेले सर्व कार्यक्रम रद्द झाले. बँड, बेंजो पार्टी चालकांसह कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.महादेवसिंग रजपूत, बँड, बेंजो पार्टीचालक
५0 लाखांचे नुकसानगेल्या वर्षी पार पडलेल्या निवडणुका, महापूर यामुळे कार्यक्रम झाले नव्हते. यावेळी गावागावांत होणाऱ्या यात्रांचे तसेच विवाहाच्या आॅर्डर मिळाल्या होत्या. काहींनी अॅडव्हान्सही दिली होती. मात्र, कार्यक्रमांना बंदी घातल्याने संबंधितांनी सर्व कार्यक्रम रद्द केले. त्यामुळे संबंधित दिलेली अॅडव्हान्स परत मागत आहेत.
सुतारमळा, पापाची तिकटी, जामदार क्लब, गंजीमाळ येथे आॅर्केस्ट्रा पथक असून, गेल्या तीन दिवसांपासून कार्यालयातच बसून राहण्याची वेळ येथील कलाकारांवर आली आहे.