कदमवाडी : कसबा बावड्यातील मायक्रो आर्टिस्ट अशी ओळख असणारे अशांत मोरे यांनी रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून जगातील सर्वांत लहान श्रीरामांच्या लाकडी पादुका, तसेच रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा व जगातील अत्यंत छोटे श्री रामचंद्रांच्या धनुष्यबाणाची प्रतिकृती तयार केली आहे.पाचशे वर्षांपासून संपूर्ण भारत देश ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आज संपूर्ण विश्वाने ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवला. श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असलेल्या अयोध्या येथे साेमवारी श्री रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा झाली आणि समस्त देशवासीय, तसेच जगातील सर्व हिंदू बांधव या उत्सवामध्ये तन-मन-धनाने सहभागी झाले, याचे औचित्य साधून आज मायक्रो आर्टिस्ट अशांत मोरे यांनी प्रभू रामचरणी आपली सेवा अर्पण करत जगातील सर्वांत लहान प्रभू रामचंद्रांच्या सागवानी लाकडी पादुका, तसेच रुद्राक्षावर श्रीरामांची प्रतिमा व जगातील अत्यंत छोटा श्रीरामाचा धनुष्यबाण याची प्रतिकृती तयार केली.यापूर्वी अशांत मोरे यांनी मायक्रोमध्ये तांदळावर विठ्ठलाचे चित्र, पेन्सिलच्या टोकावर विठ्ठलाचे शिल्प, तुळशीच्या पानावर विठ्ठलाचे चित्र, तसेच खडूमध्ये शाहू महाराज यांचे शिल्प साकारले आहे.
अयोध्या येथे साेमवारी रामलल्लाची मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी माझ्या जीवनातील आनंदाचा परमोच्च क्षण आहे. माझ्या कलेचे सार्थक झाल्याचा मला अनुभव येत आहे. -अशांत मोरे, मायक्रो आर्टिस्ट, कसबा बावडा