नेसरी : एसटी बस व दुचाकी यांच्यात समोरासमोर अपघात होऊन तिघे युवक जखमी झाले. त्यांपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, त्याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू आहेत. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, चंदगड आगाराची चंदगड-कल्याण एसटी बस (एमएच २०, बीएल २२७१) ही चंदगडहून नेसरी-गडहिंग्लज मार्गे गडहिंग्लजकडे येत होती, तर दुचाकीवरून धोंडोपंत संजय शिंगटे (वय २०), श्रीधर सदाशिव शिंगटे (२२) व नीलेश मारुती सावंत (२२, सर्व रा. मांगनूर तर्फ सावंतवाडी) हे गडहिंग्लजहून नेसरीकडे जात होते. दरम्यान, शिप्पूर तर्फ सावंतवाडीजवळील हेळेवाडी फाट्यानजीक दुचाकी व एसटी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. दुचाकीची बसच्या वाहकाच्या बाजूला जोराची धडक बसली. धडकेत धोंडोपंत शिंगटे हा गंभीर जखमी झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला, तर श्रीधर व नीलेश हे किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर नेसरीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लजला दाखल केले आहे. एसटी बसचालक सुरेश देमाणी कंग्राळकर (४६, रा. तळगुळी, ता. चंदगड) यांच्या वर्दीवरून अपघाताची नोंद नेसरी पोलिसांत झाली आहे. अधिक तपास हवालदार व्ही. एस. पाटील करीत आहेत. (वार्ताहर)
शिप्पूरजवळील अपघातात तिघे जखमी एकजण गंभीर : जखमी मांगनूर तर्फ सावंतवाडीचे रहिवासी
By admin | Published: May 12, 2014 12:25 AM