किरण कृष्णात कर्ले (वय ३२, धंदा ट्रॅक्टरचालक, रा. कुंभारवाडी, ता. पन्हाळा) यांनी जालिंदर तुकाराम सस्ते (५३, रा. साकुर्डे, ता. पुरंदर, जि. पुणे) या ट्रकचालकाविरोधात कळे पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
कुंभारवाडी येथून कर्ले हे ट्रॅक्टर (एम.एच.०९ सी.जे.१२८९) च्या मागे साडग्यातून ऊस भरून कुडित्रे येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याकडे निघाले होते. दरम्यान, जालिंदर सस्ते हे मैदा व रव्याने भरलेला बाराचाकी ट्रक (एम.एच.१२एल.टी.३५०३) घेऊन नगरहून गोव्याकडे निघाले होते. रात्री साडेनऊच्या सुमारास कळे-मल्हारपेठ फाट्याजवळ पाची आंबा परिसरात आले असता ट्रॅक्टरच्या पाठीमागील साडग्याला ट्रक घासून मारला. यावेळी जोराचा धक्का बसून साडग्याची पाठीमागील दोन्ही चाके निखळून पडली व चेस (कणा) वाकली. पुढे जाऊन उजव्या बाजूला असलेल्या सागर मिठारी यांच्या सोनाई ट्रेडर्स नावाच्या दुकानासमोरील जांभळीच्या झाडास ठोकरून ट्रक उलटला. यावेळी सोनाई ट्रेडर्सने आपल्या दारात विक्रीसाठी ठेवलेल्या बायसन दरवाजांचा (सिमेंट फळ्या) चुराडा होऊन एक लाखाचे नुकसान झाले तर ट्रॅक्टर ट्रकचे मिळून तीन लाख चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले तर ट्रकचालक सस्ते जखमी झाले. अधिक तपास सहायक फौजदार विलास सिंघन करत आहेत.
●फोटो ओळ: कळे: मैदा व रव्याने भरलेला उलटलेला ट्रक. दुसऱ्या छायाचित्रात उसाच्या ट्रॅक्टरचे साडगे.