कोल्हापूर : सलग दुसऱ्या दिवशी कोरानाने आणखी एक बळी घेतल्याने जिल्हा धास्तावला. कणेरी ता. करवीर येथील ५३ वर्षीय महिलेचा कोल्हापुरात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. सोमवारी राजोपाध्येनगरातील ६३ वर्षीय महिलेचा कोरोनाने मृत्यू झाला होता. दरम्यान, मंगळवारी कोरोना रुग्णसंख्येत आठने भर पडल्याने सक्रिय रुग्णसंख्या ५३ वर पोहचली आहे. यापैकी सात जण दवाखान्यात ॲडमिट आहेत तर एकाचा डिस्चार्ज झाला.
कोल्हापुरात चौथी लाट सुरू झाल्यानंतर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून नवे बाधित आढळू लागले आहेत. अवघ्या दोनच आठवड्यात जिल्ह्यातील बाधितांची संख्या ५३ वर गेली. रुग्णसंख्या वाढत असली तरी लक्षणे सौम्य असल्याने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी होते. मृत्यू नसल्याने मोठा दिलासाही मिळाला होता.
पण सोमवारी एक रुग्ण दगावल्याने यंत्रणा हडबडून जागी झाली. मंगळवारी आणखी एक रुग्ण दगावल्याने तर यंत्रणेची आता कसोटीच लागली आहे. अजून पावसाळा म्हणावा तसा सुरू झाला नाही तोच रुग्णसंख्या वाढत आहे, मृत्यूही होऊ लागल्याने पुन्हा एकदा सतर्कतेची मोहीम राबवावी लागणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची बंद पडलेली मोहीम पुन्हा एकदा आरोग्य विभागाला हाती घ्यावी लागणार आहे.
येथे सापडले रुग्ण
करवीर चार, हातकणंगले, पन्हाळा, शाहूवाडी, कोल्हापूर शहर प्रत्येकी एक असे एकूण आठ रुग्ण बाधित आढळले.