कोल्हापूर : बदलापूर-वांगणी दरम्यानच्या पुरामुळे मध्य रेल्वेनेकोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी श्री महालक्ष्मी एक्सप्रेस दोन दिवसांपासून रद्द केली आहे. रेल्वे रद्द झाल्याने या मार्गावरून प्रवासासाठी आरक्षण केलेल्या १०७ प्रवाशांना रेल्वेने त्यांच्या तिकिटांचे एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये परत केले आहेत. रेल्वे विभागाने तिकिटांची पूर्ण रक्कम दिली आहे.कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी शनिवारी (दि. २७) १०८ प्रवाशांनी तिकीट आरक्षित केले होते. मात्र, पुरामुळे श्री महालक्ष्मी एक्सप्रेस रद्द झाल्याने संबंधित सर्व प्रवाशांची तिकिटे रद्द झाली. या तिकिटांच्या रकमेपोटी एकूण एक लाख दोन हजार ९६५ रुपये इतका परतावा रेल्वे विभागाने दिला आहे.
रविवारी मुंबईहून कोल्हापूरला येणारी आणि कोल्हापूरमधून मुंबईला जाणारी रेल्वे रद्द करण्यात आली. त्यामुळे मुंबईसाठीचे एकूण ११, तर मुंबईहून कोल्हापूरसाठीच्या एका प्रवाशाने तिकीट रद्द केले आहे.दोन काउंटरची सुविधारेल्वे रद्द झाल्याने आरक्षित केलेल्या तिकिटांचे पूर्ण पैसे दिले जात आहेत. तीन दिवसांत रेल्वेच्या निर्धारित वेळेत तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत घेता येतात. त्यासाठी तिकीट आणि ते रद्द करीत असल्याचा अर्ज प्रवाशांनी भरून देणे आवश्यक असते.
कोल्हापूर रेल्वेस्थानकावर प्रशासनाने तिकिटांचे पैसे देण्यासाठी दोन काउंटरची सुविधा उपलब्ध करून दिली असल्याची माहिती पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी दिली.