कोल्हापूर : खते, बियाणे यांच्याबद्दलच्या वाढत्या तक्रारीनंतर कृषी विभागाचे धाडसत्र आणि कारवाईचे सत्र गुरुवारीही कायम राहिले. गुरुवारी झालेल्या सुनावणीसाठी आलेल्या चारपैकी एक कृषी सेवा केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला तर, अन्य तिघांना सक्त ताकीद देण्यात आली. निलंबन झालेल्यांमध्ये शेती सहकारी संघाच्या पन्हाळा तालुक्यातील पुनाळ शाखेचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात एकाच वेळी पथके जाऊन सेवाकेंद्राची झाडाझडती घेत आहेत. आतापर्यंत ३९२ कृषी सेवा केंद्राची तपासणी पूर्ण केली आहे, तर दोषींवर कारवाईच्या नोटिसा काढून त्यांची सुनावणीची प्रक्रियाही सुरू केली आहे. गुरुवारी आणखी ६८ केंद्रांची तपासणी झाली. तत्पूर्वी बुधवारपर्यंत तपासलेल्या ३२४ केंद्रांतील नोटिसा पाठवलेल्या केंद्रचालकांना सुनावणीसाठी बोलावण्यात आले होते. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांच्यासमोर त्यांची सुनावणी झाली. खते व बियाण्यांच्या पावत्या, साठ्यातील तफावत, वाढीव दर, शिल्लक साठा लपवणे अशा अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. पहिल्या दिवशी कारवीर तालुक्यातील दोन केंद्रांचे परवाने निलंबित झाले होते. त्यानंतर कृषीविभागाने कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे.
यांच्यावर झाली कारवाई
गुरुवारी पन्हाळा तालुक्यातील पुनाळ येथील शेती सहकारी संघाचाच परवाना निलंबित करण्यात आला. तात्यासाहेब कोरे वारणा विभाग शेतीपूरक आणि शेती प्रशिक्षण सहकारी संस्था, बाळा कल्लाप्पा कुडचे जयसिंगपूर, घालवाड, ता. शिरोळ येथील गणेश कृषी सेवा केंद्र यांना सक्त ताकीद देण्यात आली.
आणखी १८ केंद्रांना नोटिसा
गुरुवारी तपासणी केलेल्या ६८ पैकी १८ केंद्रांना कारवाईची नोटीस काढण्यात आली आहे. त्यांचीही आजपासून सुनावणी होत आहे.