कोपार्डे : बालिंगा (ता. करवीर) येथील कात्यायनी ज्वेलर्सवर चार दरोडेखोरांनी गुरुवारी भरदिवसा दरोडा टाकला होता. यावेळी पळून जाण्यासाठी वापरलेल्या दोन दुचाकी खुपिरे, यवलूजच्या हद्दीत उसाच्या शेतात आढळल्या. यामुळे हे दरोडेखोर स्थानिक असावेत, असा अंदाज आहे. घटनास्थळी करवीरचे उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान, या दरोडाप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावर बालिंगा येथील भरचौकात कात्यायनी ज्वेलर्स आहे. गुरुवारी सिनेस्टाइल पध्दतीने अज्ञात दरोडेखोरांनी गोळीबार करत ज्वेलरीचा मालक शंकर माळी व मेहुणा जितू माळी यांना गंभीर जखमी करून तीन किलो सोन्याचे दागिने व दीड लाख रुपये लुटले. चौघांनी पळून जाण्यासाठी दोन दुचाकी वापरल्या होत्या. त्यांनी त्या खुपिरे व यवलूज हद्दीत असणाऱ्या उसाच्या शेतात सोडून पसार झाल्याचे शुक्रवारी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले.नागरिका स्पिनिंग मिलकडे जाणाऱ्या पाणंद रस्त्यालगत लगत खुपिरे हद्दीत कृष्णात लहू पाटील यांच्या शेतातील विहिरीजवळ काळ्या रंगांची दुचाकी उसाच्या सरीत सोडली होती. या दुचाकीपासून अर्ध्या किमीवर यवलूज हद्दीत निवृत्ती कोले-पाटील यांच्या शेतात केशरी रंगांची दुसरी गाडी टाकली आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी खुपिरेच्या पोलिसपाटील सविता गुरव यांना या माहिती दिली. त्यांनी करवीर पोलिसांना कळविले. त्यानंतर करवीरचे उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी भेट देऊन आणखी काही पुरावे सापडतात का, याबाबत चाचपणी केली, पण काहीही सापडले नाही.चोरीची दुचाकीदरोड्यात वापरलेली केशरी रंगांच्या दुचाकीची नंबरप्लेट मोडलेली आहे. या गाडीचा नंबर एमएच ०९ बीवाय ०८९७ असून, ती साने गुरुजीतून चोरी केल्याचे सिद्ध झाले आहे. काळ्या रंगांच्या दुचाकीवर मात्र नंबरप्लेट नाही.
दरोडेखोरांचा माग सापडला पण मुद्देमाल नाहीदरोडेखोर कोल्हापूर - गगनबावडा रस्त्यावरून थेट कळेच्या दिशेने गेले. मात्र, ते कोपार्डे येथील जनावरांच्या बाजाराजवळून यवलूजच्या दिशेने व कोपार्डे येथील बादटेकवरून नागरिका स्पिनिंगकडे जाणाऱ्या रस्त्यावरून खुपिरे येथे जेथे गाड्या टाकल्या तेथेपर्यंत गेले होते. हे एका घराला असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
दरोड्यानंतर अवघ्या सहा किमीवर दरोडेखोरदुचाकी सापडलेले ठिकाण व दरोड्याचे ठिकाण यातील अंतर केवळ सहा किमीचे आहे. पोलिसांनी तत्परता दाखवली असती, तर चोरटे सापडले असते.