कोल्हापूर : येथील महावीर गार्डननजीक रस्त्याकडेला असलेले मोठे झाड अचानक धावत्या कारवर कोसळले. आज, सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरीकांनी कारमध्ये अडकलेल्या चालकाला सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर सहिसलामत बाहेर काढले. त्याला दुखापत झाली आहे. वाहनांची मोठी वर्दळ असलेल्या या रस्त्यावर ही घटना घडल्याने परिसरात खळबळ माजली.जिल्हाधिकारी कार्यालयात कामासाठी येणाऱ्याची मोठी गर्दी असते. दरम्यान, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खानविलकर पेट्रोलपंपकडे जाणाऱ्या मार्गावर महावीर गार्डनशेजारी मोठे झाड अचानक उन्मळून रस्त्यावर पडले. हे झाड रस्त्यावरुन धावणाऱ्या एका अलीशान मोटारीवर कोसळले. अचानक झालेल्या या घटनेमुळे परिसरात काहीवेळ गोंधळ उडाला.
नागरीकांनी व इतर वाहनधारकांनी तातडीने मदतकार्य राबवून त्या मोटारीत सापडलेल्या चालकाची सुमारे अर्धा तासाच्या अथक प्रयत्नानंतर बाहेर काढले. त्यांला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे जवानही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महावितरण कर्मचाऱ्यांनीही परिसरातील वीज पुरवठा खंडीत करुन मदत कार्यात सहभाग घेतला. या झाडाखाली फुटपाथवर अनेक दुचाकी व भेलपुरीच्या गाड्या होत्या पण त्या सहिसलामत राहील्या.मोठे झाडच रस्त्यावर पडल्याने जिल्हाधिकारी कार्यालय ते खानविलकर पेट्रोलपंपाकडे जाणारी सर्व वाहतूक बंद झाली, त्यामुळे एकेरी मार्गच सुरु राहीला. तर खानिवलकर पेट्रोलपंपाकडे जाणारी वाहतूक व्हिनस कॉर्नर व महावीर कॉलेज मार्गे वळवण्यात आली. सुमारे दोन तासानंतर झाडाच्या फांद्या तोडून हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत खुला करण्यात आला.