कोल्हापूर : मित्रांना सोडायला कोल्हापुरात येताना महामार्गावर तावडे हॉटेलजवळ भरधाव कार दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात कारमधील एकजण ठार झाला, तर चालक जखमी झाला. बाळकृष्ण शंकर पवार (वय ३८, रा. शाहूनगर रिंगरोड, उरुण-इस्लामपूर, जि. सांगली) असे मृताचे नाव आहे, तर अंकुश भगवान पाटील (वय ३४, रा. इस्लामपूर) असे जखमी चालकाचे नाव आहे. हा अपघात शनिवारी (दि. ३०) मध्यरात्री एकच्या सुमारास झाला.सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, इस्लामपुरातील बाळकृष्ण पवार हे मित्रांना सोडण्यासाठी शनिवारी रात्री उशिरा कोल्हापुरात येत होते. चालक अंकुश पाटील हे अलिशान कार चालवत होते. महामार्गावर पंचगंगा नदीवरील पुलाजवळ चालकाचे नियंत्रण सुटून कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकली.या अपघातात गंभीर जखमी झालेले पवार यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. जखमी पाटील यांच्यावर उपचार करण्यात आपले. इतर दोन मित्र किरकोळ जखमी झाले. पवार यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. अपघाताची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली.
कार दुभाजकाला धडकून एक ठार, एक जखमी; मित्रांना सोडायला कोल्हापुरात येताना झाला अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2024 4:33 PM